बारामती : महान्यूज लाईव्ह
सराईत गुंड बाळा दराडे पासून ते भोंदूबाबा मनोहरमामा भोसले पर्यंत अनेकांना बारामती तालुका पोलिसांचा हिसका दाखवणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचं कौतुक आज पाटसवरून बारामतीत स्थायिक झालेल्या शितोळे दांपत्याने थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमोर केले आणि ‘अजितदादा तुमच्यामुळे ही होत असलेली तत्परता आमच्यासारख्या कष्टकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे‘ असे सांगितले, दादांनी काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला दिला, तेव्हा या दांपत्याला अगदी भरून आले..
आज जनता दरबाराच्या निमित्ताने बारामतीतील विद्या प्रदेशांच्या माहिती व तंत्रज्ञान सभागृहात सर्वसामान्य लोकांशी भेटत असलेल्या अजित पवार यांच्यासमोर सुजित शितोळे हे सपत्नीक आले आणि त्यांनी अजित दादांना काम काहीच नाही, दादा फक्त धन्यवाद व आभार मानण्यासाठी आलो असे शब्द वापरले.
त्यावर अजित पवार यांनी सर्व माहिती विचारली आणि शितोळे दाम्पत्यांनी त्यांच्या घरात घडलेला प्रकार सांगितला. पाच जुलै रोजी काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या शितोळे दांपत्याला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बारामतीतील अभिमन्यू कॉर्नर येथील निर्मिती पार्क येथील त्यांच्या राहत्या सदनिकेची चोरी झाल्याचे समजले.
त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण जेव्हा ते सदनिकेत गेले आणि त्यांनी त्यांच्या कपाटातील सर्व ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना धक्का बसला, कारण चोरट्यांनी थोडे थोडे नव्हे तर तब्बल 12 तोळे सोने आणि एकूण पाच लाख साठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
आपण कष्टाने थोडे थोडे पैसे जमवून केलेल्या या गुंतवणुकीवर चोरट्याने डल्ला मारल्याने शितोळे कुटुंबीय हवालदिल झाले. त्यांनी तातडीने बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची भेट घेतली. ढवाण यांनी त्यांना दिलासा देत गुन्हा दाखल करून घेतला आणि या एका अफलातून चोरीचा तपास सुरू झाला.
ढवाण यांनी अत्यंत तत्परतेने या तपासाची सूत्रे हलवली आणि अवघ्या चार दिवसात तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने तपास आणखी वेगवान केला. चोरीच्या प्रकाराच्या पद्धतीवरून आणि एकूण हालचालीवरून त्यांनी काही संशयतांची तपासणी सुरू केली आणि यानंतर त्यांना खात्री पटलेल्या संशयिताला पुण्यातील कोरेगाव पार्क येथून ताब्यात घेतले. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या या पथकाने ही कामगिरी अगदी चार दिवसात पार पाडली.
या आरोपीने सुरुवातीला चकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखी या गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेला ऐवज देखील पोलिसांनी हस्तगत केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शितोळे परिवार अगदी भारावून गेला. त्यांना काय बोलावे ते देखील सुचेना!
त्यांनी पोलिसांचे आभार तर मानलेच, पण आज योगायोगाने अजित पवार बारामतीत येणार होते याची माहिती मिळताच काही अंतरावरच राहत असलेल्या अभिमन्यू पार्क मधून ते विद्यापीठांच्या माहिती तंत्रज्ञान सभागृहात आले. आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्था आम्ही फक्त ऐकून होतो, पण त्याचा प्रत्यक्ष आम्हाला याची देही याची डोळा अनुभव मिळाला असे त्यांनी सांगताना अजित पवार यांनी स्मित हास्य केले व तालुका पोलिसांचे कौतुक केले.
शितोळे यांच्यासह बारामतीतील सर्वच नागरिकांना प्रत्येकाने काळजी घ्यावी असा सल्ला दिला. बारामती पोलिसांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले, मात्र चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल थेट लोकप्रतिनिधींना धन्यवाद देण्यासाठी एखादे कुटुंब येते याचा एक वेगळे चित्र आज बारामतीत पाहायला मिळाले.