घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
पंतप्रधानांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर बसविलेल्या नव्या अशोक स्तंभाचे अनावरण केले. या अशोक स्तंभाचे चित्र सोशल मिडियावरून सगळीकडे गेल्यानंतर आता यावर वाद सुरु झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संसद भवनात उभारला गेलेला नवा अशोक स्तंभ हा भारताच्या राजमुद्रेतील अशोक स्तंभाहून वेगळा आहे. मोदींच्या धक्कातंत्राप्रमाणे त्यांनी थेट भारताची राजमुद्राच बदलून टाकण्याचा घाट घातला आहे. काही काळातच यावरून मोठा वाद उभा राहिल यात शंकाच नाही.
मुळातला जो भारताच्या राजमुद्रेतील अशोक स्तंभ होता, तो सारनाथ येथील संग्रहालयात असलेल्या अशोक स्तंभाची प्रतिकृती आहे. हा स्तंभ सम्राट अशोकाने उभारलेला आहे. या स्तंभावर चार सिंह आहेत, आणि जे शांत भावमुद्रेत आहेत. जो स्तंभ नव्या संसद भवनातील छतावर उभारला गेला आहे, त्यातील चारही सिंह हे उग्र आणि हिंस्त्र स्वरुपात दाखवले गेले आहेत.
यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकतर याला शिल्पाला अशोक स्तंभ कसे म्हणायचे. हा मुळ अशोक स्तंभाप्रमाणे नाही, याला फारतर ‘ नरेंद्र स्तंभ ‘ म्हणता येऊ शकते.
कोणाशीही कसलीही चर्चा न करता भारताची राजमुद्रा असलेल्या या शिल्पात असा बदल कसा काय केला गेला. आता हे नवीन शिल्प भारताच्या राजमुद्रेची जागा घेणार आहे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
देशात भारतात सत्तेवर असलेले शासक स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. याच कारणाने त्यांना अप्रिय असणाऱ्या गोष्टीमध्ये सम्राट अशोकाचे नाव येते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची तत्वे स्विकारली. सगळ्या जगभर आज जो बौद्ध धर्म पसरला आहे, त्याचे मोठे श्रेय हे सम्राट अशोकाला जाते. परंतू याच कारणामुळे हे हिंदुत्ववादी अशोकावर नाराज असतात. कदाचित याच कारणामुळे हा अशोक स्तंभ बदलण्याचा घाट घातला गेला असावा.
खरे पाहता ज्या सम्राटाच्या काळात भारताचा सर्वाधिक भाग एकाच राज्यछत्राखाली होता, अशा केवळ तीन राजसत्तांमध्ये सम्राट अशोकाच्या राज्यसत्तेचा समावेश होता. अशोकाचे साम्राज्य हे त्या काळापर्यंतचे भारताचा सर्वाधिक भाग व्यापलेले साम्राज्य होते. हिंदुत्ववाद्यांना हे सांगायला फारच अवघड जाते. त्यानंतरचे या यादीतील दुसरे नाव तर त्यांना अजिबात आवडत नाही, ते नाव आहे मुघल बादशहा औरंगजेब. त्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतावर राज्य केले ते होते ब्रिटीश.
खरे तर ब्रिटीश परदेशी म्हणून त्यांना असणारा विरोध समजून घेता येतो. औरंगजेबांच्या आजोबापासून सगळे मुघल बादशहा भारतात जन्मलेले म्हणजे स्थानिकच. पण त्यांच्या धर्माचा जन्म भारताबाहेरचा असल्याने त्याला विरोध हेदेखील एकवेळ मान्य करता येईल. पण सम्राट अशोक. त्याला विरोध कशासाठी.
कोणताही भाजपाचा नेता सार्वजनिकरित्या सम्राट अशोकाविरोधात विधान करणार नाही. पण खाजगी चर्चेत सम्राट अशोकाबद्दलची नाराजी स्पष्ट दिसते. खास हिंदुत्ववाद्यांच्या व्हाटसएपग्रुपवर ज्यांना दररोज शिव्याशाप दिल्या जातात, त्या नावांमध्ये सम्राट अशोकाचेही नाव असते. पण ज्यावेळी भारताची राजमुद्रा, जी प्रत्येक सरकारी कागदपत्रांवर असते, नोटांवर असते, असंख्य संविधान स्तंभावर विराजमान असते, ती अचानकपणे भारतीय लोकशाहीचे जे सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवनाच्या छतावरून हटविली जाते आणि तिथे दुसरीच प्रतिमा लावली जाते, त्यावेळी मोठा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
अर्थात नरेंद्र मोदींचे करोडो भक्त या घटनेचेही समर्थन करण्यासाठी सोशल मिडियापासून रस्त्यांपर्यंत उतरतील याबाबत काहीच शंका नाही. सध्यातरी सगळ्या माध्यमांनी याबाबत मिठाची गुळणी धरली आहे. याबाबत काही बोलण्यापेक्षा श्रीलंकेत काय घडतेय ते दाखवत राहण्यात त्यांनी जास्त इंटरेस्ट दाखवला आहे. खरे पाहिले तर जे श्रीलंकेत अतीशय हिंसक रित्या घडते आहे, तेच आपल्याकडे अतीशय शांतपणे घडवले जाते आहे.
यापु्र्वी घडून गेलेल्या इतिहासातील आपल्याला नको असलेली प्रतिके बाजूला काढून एक नवाच इतिहास लोकांपुढे ठेवण्याचा उद्योग सध्या सुरु आहे. मात्र अचानक एके दिवशी राष्ट्राचे प्रतिक असलेला चक्रवर्ती सम्राट अशोकाचा स्तंभच बाजूला काढून टाकणे हा यातील अतीशय गंभीर असा प्रकार आहे.
जर बहुसंख्य भारतीयांना यामध्ये काही गंभीर वाटत नसेल तर हे खरोखरच धोकादायक आहे. आपण अतीशय वेगाने अनियंत्रित अशा धर्मवेडाने पुरेपूर अशा हुकुमशाहीकडे निघालो असल्याचेच हे चिन्ह आहे.
यामुळे ज्यांच्यामध्ये अजूनही सद्सदविवेकबुद्धी उरली असेल अशा प्रत्येकाने याचा विरोध करण्याची गरज आहे
निषेध निषेध निषेध