बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यात रिमझिम पावसाचा खेळ सुरू असला, तरी हे तालुके ज्यावर अवलंबून आहेत अशा वीरधरण साखळीत सध्या चांगला पाऊस पडतोय. त्याचप्रमाणे मुळा मुठा उजव्या कालव्याचा परिसर असलेल्या खडकवासला धरण साखळीतही पाऊस चांगला पडत आहे. वीर धरण साखळीत काल एकाच दिवसात जवळपास दीड टीएमसी हून अधिक पाणी जमा झाले आहे.
काल भाटघर धरण क्षेत्रामध्ये दिवसभरात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 5.8 टीएमसी पाणी जमा झाले आहे, सध्या या धरण क्षेत्रात 24.76% पाण्याची टक्केवारी आहे. वीर धरण क्षेत्रामध्ये काल दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 4.3 टीएमसी पाणी आतापर्यंत जमा झाले आहे. तर धरणात आत्तापर्यंतचा पाणीसाठा 46.69 टक्के झाला आहे.
सर्वाधिक पाऊस काल गुंजवणी धरण क्षेत्रामध्ये पडला असून तेथे 77 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुंजवणी धरण क्षेत्रामध्ये दीड टीएमसी पाणी जमा झाले असून धरणाच्या क्षमतेनुसार चाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाची तुलना करता यावर्षी अधिक पाणी निरा खोऱ्यात साठले असून मागील वर्षी याच दिवशी मीरा खोऱ्यातील धरण साखळीमध्ये १२.५० टीएमसी पाणी होते व एकूण पाण्याची टक्केवारी 25.87% होती, मात्र आता यावर्षी काल संध्याकाळपर्यंत 14.36 टीएमसी पाणी जमा झाले असून 29.67% पाणीसाठा झाला आहे.