आता तर पूजावरच गुन्हा दाखल करायचा म्हणतो.. लोकशाहीचा पाळणा असाच गदागदा हलवावा म्हणतो..!! राजकारणात संजय फार झाले, दृष्टी मात्र कोतीच राहिली.. भले अनैतिक असो, पाठिंबा दिला की इडा पिडा टळून गेली..!!
कलियुगातही नवीन ट्रेंड आलाय.. आम्ही ठरवू नैतिक कोण? जाणून घ्यायला आमची शक्ती; तुमच्याजवळ हवा दृष्टिकोन..! आम्ही पाहतोय सध्या चौकाचौकातले पुतळे रडताना.. चित्र सगळं दिसतंय बेसूर.. अन् लोकशाही उदासीन होताना..!
पूजाने केली आत्महत्या.. राज्य ढवळून निघालं.. रात्रंदिवस आरोप प्रत्यारोपानं.. सरकार हवालदिल झालं… अजून स्मरणात आहे, तिचं दुनियेतून जाणं.. अन पापक्षालनासाठी त्याचं मोह मंदिरातलं रडगाणं…!!
घटिका बुडून गेली.. काळरात्र ती स्मरताना!आवाज बुडून गेला.. राज्य त्याचं संपताना..! तेच तेच कॉल अन् गबरू शेठ चा कारनामा..! आज तेच तोंड बंद झाले, ज्याने केला पंचनामा..!
लोकशाहीच्या या राज्यात बाळू भेटतो काळूला; काळू भेटतो साळूला..! तेच प्रश्न अन् नवी उत्तरे संजयाच्या दिमतीला..! म्हणतात असं की, इथेच फेडावी लागतात पापं, अन करावी लागते क्षमायाचना..!!
म्हणून आता पूजावरच गुन्हा दाखल करायचा म्हणतो..! मेला नाही आत्मा; तरी मेल्याचा आव आणतो..!! खांदेपालट होता तिकडे; इकडे संजय पवित्र होतो..!!
सत्तेत वाटा देण्या; गोटात तो मिळाला.. त्याच्यावरचा किटाळकाला क्षणात धुळीस मिळाला..!! निरमा सुद्धा फिका पडावा.. एवढा आहे शुभ्रपणा..! राजसत्तेच्या वाशिंग मशीनमध्ये केवढा आहे, धीटबाणा..!!