बळीराजासाठी भरपूर पाऊस पडु दे! विठ्ठलला घातले साकडे!
राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड: पुणे जिल्ह्यात प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील डाळींब येथील विठ्ठल बन मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा व आरती घेण्यात आली.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे डाळींब येथील विठ्ठल बन मंदिर आषाढी एकादशी दिवशी बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता आले नाही. यंदा मात्र आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी मंदिर खुले असल्याने रविवारी भाविकांची पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी झाली होती.
रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत आहेत. यावेळी आमदार संजय जगताप म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत, यावर्षी प्रथम आरोग्य संपदा आणि पाऊस हे दोन्ही भरपूर प्रमाणात द्यावी, अशी प्रार्थना आमदार जगताप यांनी विठ्ठल चरणी केली.
आमदार जगताप पुढे म्हणाले, मी सोपाननगरी सासवड येथे राहतो, विठ्ठलबन आणि सोपाननगरीची भावनिक आणि भक्तीची नाळ आहे, त्यामुळे येथे येण्याची ओढ वाटते. येथे येऊन दर्शन घेतल्यावर आत्मिक समाधान लाभते. मी पुरंदरचा आमदार आहे. त्यामुळे मी येथे आलो, तरी मला निधी देत येत नाही, तरीही येथे येण्याची ओढ लक्षात घेऊन मी माझे वडील स्व. चँदुकाका जगताप यांचे स्मरणार्थ पाच लाख रुपये देवस्थान विकास कामास देत आहे.
यावेळी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कीर्ती काचंन, हवेळीच्या माजी सभापती हेमलता बडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, दौंड पंचायत सदस्य सुशांत दरेकर, नितीन दोरगे, दौंड कांग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल खराडे, उरुळी कांचन चे सरपंच राजेंद्र बबन कांचन, जेष्ठ नेते माऊली कांचन, रामदास चौधरी, भाऊसाहेब कांचन आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र काचंन,तर सूत्र संचालन लक्षीमन म्हस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव तानाजी म्हस्के यांनी मानले.