तमन्ना शेख यांचा वरकुटे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सन्मान..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : ती शालेय दशेतच सुरुवातीपासूनच चुणचुणीत होती.. प्रत्येक गोष्ट त्वरित आत्मसात करण्याचा तिचा गुण तिच्या आयुष्यात तिला खूप मोठे घडवेल असा तिच्या शिक्षकांनाही विश्वास होता.. म्हणूनच मराठी शाळेत शिकून स्पर्धा परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात झेंडा मिरवला.. अन् वरकुटे खुर्द येथील तमन्ना हिचा गावकऱ्यांनी मोठा सत्कार केला..
2020 मध्ये झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत नायब तहसिलदार पदी निवड झाल्याबद्दल कु.तमन्ना हमीद शेख हिचा वरकुटे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
सत्काराचे प्रास्तविक प्राथमिक शिक्षक पतसंस्था इंदापूरचे सहसचिव ताहेर शेख यांनी केले.
तमन्ना शेख हिचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. शुभेच्छा देताना वरकुटे खुर्द गावचे माजी आदर्श सरपंच शिवाजी यादव यांनी गोरगरीब जनतेची सेवा घडावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
तमन्ना शेख हिने सत्काराला उत्तर देताना मुलींना शिक्षण द्या. खूप शिकवा असं सांगत अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्की मिळते असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, अमोल शिंदे, हनुमंत पवार, नितीन शेंडे, बकसभाई शेख, इस्माईल मुलाणी, शमशुद्दीन शेख, रियाज शेख, इर्शाद शेख, तय्यब शेख, शब्बीर मुलाणी, इन्नूस शेख, अमजद शेख, फरीद शेख, बबलू पठाण, भैय्या शेख ,करीम शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.