सुपे येथील भावकीतील शेताचा ६० वर्षाचा रस्त्यांचा वाद संपुष्टात! राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे यांचा प्रयत्नांना यश !
सचिन पवार, महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे येथील ६० वर्षांचा नेवसे भावकीचा त्यांच्या शेतातील रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. वर्षानुवर्षे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी कोर्टात वाद चालू असून प्रसंगी मारामाऱ्या होऊन गुन्हेही दाखल झाले आहेत. पिढ्यानपिढ्या हा वाद चालू राहतो, त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होऊन दोन्ही बाजूंनी अधोगती होते. मात्र सुपे येथील नेवसे कुटुंबात घेतलेला निर्णय हे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून जिल्ह्याबरोबर संपूर्ण राज्यात आदर्शवत ठरले आहे.
सुपे येथील वालुबाई मळा येथील शेतकरी सुदाम राजाराम नेवसे यांनी आपल्या गट नं. ८९ व त्यांचे चुलत चुलते गजानन सोपान नेवसे यांनी आपल्या गट नं.९० यांच्या क्षेत्राच्या बांधावरून हा रस्ता दिला आहे. वालुबाई मळा येथील ओढा ते नेवसे वस्ती ११ ते १५ गुंठे इतकी जागा देऊन येथील ग्रामपंचायतीला रस्त्यासाठी मंजुरी दिली आहे.
अशा प्रकारच्या आदर्शवत प्रेरणादायी व दातृत्ववादी निर्णयामुळे दोघांचेही सुपे परिसरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. खाजगी मालकीच्या क्षेत्रातून दोघांनीही सामांज्यासागे रस्त्यास मंजुरी दिल्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे.
सुदाम नेवसे यांचे आजोबा कै. नाना नारायण नेवसे, वडील कै.राजाराम नाना नेवसे तसेच गजानन सोपान नेवसे यांचे वडील सोपान नारायण नेवसे यांच्यामध्ये ओढ्यापासून नेवसे वस्तीपर्यंत रस्त्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद जवळपास ६० वर्षांपासून जास्त कालावधीचा होता.
पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने जाणे येणे होत नव्हते. शेतातील माल नेण्यासाठी व मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असे.या भागातील पदाधिकाऱ्यांनी हा वाद वारंवार मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते.
यामध्ये माजी सरपंच बी. के. हिरवे, शौकतभाई कोतवाल, महादेव जगताप, मंदाताई खैरे, दिगंबर पन्हाळे, दादा कुतवळ पाटील यांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले होते. ग्रामसभेत अनेक वेळा या रस्त्याच्या विषयावर चर्चाही झाली होती.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची वारंवार पाहणी करून सबंधित शेतकऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र विरोध असल्याने या रस्त्याचा प्रश्न रेंगाळला गेला. यावेळी पंचायत समिती माजी सभापती निता बारवकर, उद्योजक संजय बारवकर यांनीही या रस्त्यासाठी प्रयत्न केले होते. खाजगी क्षेत्रातून हा रस्ता जात असल्याने अनेकांनी चर्चा करणे सोडूनच दिले होते.
वारंवार या रस्त्याचा प्रश्न चर्चिला गेल्यामुळे परिसरात नेवसे वस्तीकडे जाणारा रस्ता चेष्टेचा विषय बनला होता. अखेर १ जुलै रोजी क्षेत्राला रस्ता किती महत्वाचा आहे, यासंदर्भात पदाधिकारी व युवक कार्यकर्ते यांनी शेतकरी सुदाम नेवसे व गजानन नेवसे यांना एकत्र भेटून समजावून सांगितले.
२ जुलै रोजी रस्त्यावरच दोन्ही शेतकऱ्यांना एकत्र बोलावून बैठक घेण्यात आली. यावेळी सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे यांचे पती, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढम, राहुल पवार, प्रमोद देव, मनोहर ननवरे, गणेश नेवसे, अमोल बारवकर, सतीश तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी दोन्हीही शेतकऱ्यांनी दोन पावले मागे येऊन भवितव्याचा विचार करून रस्त्याच्या कामास मंजुरी दिली आणि लगेचच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रस्त्याची पाहणी करण्यात येऊन रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. बांधावरील झाडे, काटेरी झुडपे, बोरी जेसीबीच्या माध्यमातून काढण्यात आली. या रस्त्याचे सध्या मुरुमीकरण करण्यात आले असून खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी केली आहे.
स्वाती अनिल हिरवे – सरपंच सुपे, ता बारामती – वालुबाई मळा ते नेवसे वस्ती हा अनेक वर्षाचा पश्न होता दोन्ही समंज्यस शेतकरी यांनी भविष्यातील विचार करता रस्ता करण्यास समंती दिली. या त्यांचा भुमिकेचे ग्रामपंचायत सुपे यामार्फत कौतुक करावे तेवढे कमी आहे, सर्वानी याचा आदर्श घेऊन आपल्या भागातील समस्या मिटवाव्यात म्हणजे विकास कामांना चालना मिळेल