बारामती : महान्यूज लाईव्ह
अखेर राज्यातील 77 तालुक्यामधील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीच्या निवडणुका सरकारने निवडणूक जाहीर केल्या आहेत. या मध्ये आज जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार 28 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार असून, 18 ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतरानंतर नगरपरिषदा व नगरपंचायत यांचा मोठा रणधुमाळीचा कालावधी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आज राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिसूचना जाहीर केली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा या तालुक्यातील 92 नगरपरिषदांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कमी पावसाच्या प्रदेशातील या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. या संदर्भात 17 मे 2022 रोजी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता.
राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या अधिसूचनेनुसार अंतिम प्रभागणीय मतदार याद्या अधिप्रमाणित करून पाच जुलै 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी हे निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील, तर निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 22 जुलै रोजी सकाळी 11 ते 28 जुलै 2022 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.
हे अर्ज 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. रविवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या उमेदवारी अर्जांची छाननी 29 जुलै 2022 रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदतीचा कालावधी हा 4 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणुकीचे चिन्ह देऊन अंतिमरीत्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी या नगरपरिषदा व नगरपंचायत साठी मतदान होणार आहे.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी या नगरपरिषदा व नगरपंचायत यांचा निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये वर्गातील नगरपरिषदांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, जालना जिल्ह्यातील जालना, बीड जिल्ह्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगरपरिषदेचा समावेश आहे. यासह 92 नगरपरिषदा या राज्यातील आहेत.