मोहरी खुर्द गावाची सत्ता पती-पत्नीच्या ताब्यात; सरपंचपदी पती तर उपसरपंचपदी पत्नी. गावच्या इतिहासात पहिलीच घटना
घनश्याम केळकर, महान्यूज लाईव्ह
भोर, – भोर तालुक्यातील मोहरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पती तर उपसरपंचपदी पत्नी म्हणून विराजमान झाले असून गावच्या इतिहासात पहिलीच घटना असल्याने गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे परिसरात बोलले जात असून या पती-पत्नी दांपत्याचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
मोहरी खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिल्पा सतिश पांगारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे पती सतिश पांगारकर हे गावचे सरपंच असल्याने गावच्या सरपंच उपसरपंचपदी पती -पत्नी ची निवड झाल्याची मोहरी गावच्या इतिहासात पहिलीच घटना घडली आहे.
मोहरी खुर्द गावच्या ग्रामपंचायतीची निवडणुक जानेवारी 2021 मधे पार पडली असुन या निवडणुकीत सतिश पांगारकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने 7 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. त्या मध्ये स्वतः सतिश पांगारकर व त्यांची पत्नी शिल्पा पांगारकर हे दोघे पती पत्नी बिनिविरोध विजयी झाले होते. यावेळी सतिश पांगारकर हे सरपंच झाले.
तर पहिल्या वर्षी मनिषा सागर पांगारकर या महिला सदस्या उपसरपंच झाल्या होत्या. एक वर्ष पुर्ण झाल्यावर मनिषा पांगारकर यांनी राजीनामा दिल्यावर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सतिश पांगारकर यांच्या पत्नी शिल्पा पांगारकर या बिनविरोध विजयी झाल्याने सरपंचपदावर पती सतिश पांगारकर व उपसरपंचपदावर पत्नी शिल्पा पांगारकर यांची निवड झाली आहे.
मोहरी गावच्या इतिहासात प्रथमच पती पत्नी सरपंच उपसरपंच पदावर काम करत आहेत. या निवडीच्या वेळी सरपंच सतिश पांगारकर, सदस्य सागर सहदेव पांगारकर, मनिषा सागर पांगारकर, ज्ञानेश्वर शामराव चव्हाण, वर्षा सुरेश पांगारकर, नंदा प्रकाश पांगारकर हे सदस्य उपस्थित होते.
गावच्या ग्रामसेवीका ज्योती आहेरराव यांनी निवडणुकीचे कामकाज पाहीले. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच शिल्पा पांगारकर यांचा सत्कार करण्यात आला. गावच्या विकासासाठी पती पत्नी एकमताने काम करणार असल्याचे ग्वाही यावेळी पांगारकर दाम्पत्यांनी दिली.