विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील रुई येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या घटनेत घरातील खर्चावरून व पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून जीव घेतला होता. या खटल्यात बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.ए. शेख यांनी रुई येथील जावेद बबलू पठाण याला जन्मठेपेची शिक्षा, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून सुनील वसेकर यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले या खटल्याची थोडक्यात हाकिकत अशी ही घटना 23 जून 2017 रोजी घडली होती मोर्चा उत्तर प्रदेश मधील व सध्या बारामती तालुक्यातील रुई येथे राहत असलेल्या जावेद बबलू पठाण याचा त्याची पत्नी मीना जावेद पठाण तिच्याशी घरातील खर्चावरून व पैशाच्या कारणावरून वाद झाला. यापूर्वीही सतत वाद होत होते.
23 जून रोजी जेवण करून अकरा वाजता हे दोघे मोरया अपार्टमेंटमधील टेरेसवरती झोपायला गेले. त्यावेळी पुन्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. तेव्हा चिडून जाऊन जावेद याने पत्नी मीना हिचा गळा दाबला. यात मीना हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात जावेद याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब सोनवलकर व यांनी जावेद याच्या विरोधात सरकारी पक्षातर्फे फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. काळे यांनी केला होता.
त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जे.ए. शेख यांच्या समोर चालली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील वसेकर यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून जावेद पठाण यास जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
या खटल्यात बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस हवालदार अभिमन्यू कवडे, एन.ए. नलावडे यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.