राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महा – आयटीच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून ही सेवा ठप्प आहे. परिणामी दौंड तालुक्यात शासनाच्या विविध दाखल्यांसाठी व प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जदारांचे दाखले शासन दरबारी रखडले आहेत.
प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असुन याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लक्ष घालून ही सेवा दुरुस्त करून ऑनलाइन सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी व अर्जदारांकडून होत आहे.
राज्य सरकारच्या महा-आयटी विभागांमार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या माध्यमातून शासकीय प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले तसेच इतर शासकीय कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहेत. त्यासाठी अनेक विद्यार्थी व अर्जदार ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज दाखल करीत आहेत.
मात्र मागील अनेक दिवसांपासून महा आयटीच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे काम सातत्याने बंद – चालू होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या विविध दाखले वेळेवर उपलब्ध होत नसुन विलंब लागत असल्याने मोठ्या शैक्षणिक नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ विद्यार्थी व अर्जदारांवर आली आहे.
सध्या इयत्ता दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्र व दाखले कागदपत्रांची आवश्यकता लागत आहे. आवश्यक कागदपत्रे घेऊन हे विद्यार्थी स्थानिक महा-ई-सेवा केंद्र व सेतू केंद्रात ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करीत आहेत. मात्र अर्ज दाखल करून दहा-पंधरा दिवसाचा कालावधी होऊनही त्यांना ऑनलाईन पद्धतीने दाखले उपलब्ध होत नाहीत.
दरम्यान या प्रकरणी स्थानिक सेतू केंद्राच्या चालकाशी संपर्क साधला असता, सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काम ठप्प असल्याचे सांगण्यात आले. एकूणच शालेय विद्यार्थी व इतर अर्जदारांना शासकीय दाखले वेळेवर उपलब्ध होत नसल्याने व ते घेण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून महा आयटीच्या सर्व्हर मध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याचे समोर येत आहे.
ह्या सर्व्हरमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लक्ष घालून लवकरात लवकर या सर्व्हर मधील तांत्रिक बिघाड मधील दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना वेळेत विविध दाखले मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थी व इतर अर्जदार करीत आहेत.