सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सत्ता येते आणि जाते.. सत्तेचा ताम्रपट कुणी घेऊन आलेलं नाही.. अशी वाक्य अनेकदा आपण राजकारणात ऐकतो, मात्र ज्या पद्धतीने अवकाळी पावसाच्या काळात भरून आलेले ढग विशिष्टच भागात पडतात.. त्यावेळी अगदी दोन-चार फुटापर्यंत भरपूर पाऊस असतो आणि दोन चार फुट अंतरावरती काहीच पाऊस नसतो, असे चित्र जे आपण एरवी पाहतो तेच चित्र काल-परवा इंदापूर तालुक्याने अनुभवले..
महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक उलथापालथ होणारी घटना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण राज्याने पाहिली. सुरतला गेलेल्या सुरुवातीच्या 13 आणि नंतर गुवाहाटी पर्यंत 50 वर जमलेल्या आमदारांनी अडीच वर्षांची ठाकरे सरकारची सत्ता काही क्षणात उलथवून टाकली. या उलटापालथीच्या घटना मुंबई पाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्यात लागलीच पाहायला मिळाल्या. इंदापूर तालुक्याला मात्र वेगळाच क्षण अनुभवायला मिळाला.
ज्यावेळी ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे निदर्शनास आले आणि कधी नव्हे ते राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी अत्यंत कार्यक्षमतेने लागलीच सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला, त्यावेळी संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात मार्गक्रमण करत होता.
हा पालखी सोहळा बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्याच्या वेशीवर म्हणजे भवानीनगर येथे पोहोचला, तेव्हा या पालखी सोहळ्याचे स्वागत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्यासह 16 खात्यांचे राज्यमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी केले.
भवानीनगरच्या हद्दीत पालखी सोहळ्याचे स्वागत करून दत्तात्रय भरणे यांनी रथाचे सारथ्य देखील केले. त्यानंतर पालखी सोहळा भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पालखीतळावर विसावला. तेथे साधारणपणे पाऊण ते एक तासाचा विसावा घेऊन पालखी सोहळा सणसर कडे मार्गस्थ झाला.
सणसर या इंदापूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळा गेल्यानंतर रात्री पावणे बारा वाजता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत अगदी काही क्षणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. साहजिकच महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ काही क्षणात बरखास्त झाले.
अवघ्या काही तासापूर्वीच भरणे यांनी सारथ्य केलेला पालखी सोहळा अजूनही सणसर मुक्कामीच होता. हे अंतर होते केवळ दोन किलोमीटरचे.. फक्त काही तासांचा अवधी भरणे राज्यमंत्र्याचे आमदार बनले आणि इकडे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांना जणू आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
इंदापूर तालुक्यात गेल्या सात-साडेसात वर्षात दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्यांची विविध विकासाची कामे इंदापूर तालुक्यात आणली ही वस्तुस्थिती आहे. अर्थात हे करताना त्यांनी गावागावात विरोधकांना अत्यंत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावागावात भाजपचे समर्थक करताना दिसत आहेत, अशा कोंडीत सापडलेल्या भाजपाच्या समर्थकांना या सरकारच्या टांगापलटीने जणू दहा हत्तीचे बळ मिळाले.
भरणे यांचा जनसंपर्क दांडगा आहे असे कालपर्यंत म्हणणाऱ्या अनेकांनी मग अगदी चौकात चौकात आणि रस्त्यावर येऊन आता भरणे यांची कशी कोंडी होऊ शकते, जिल्हा परिषदेला कशी टांगापलटी होऊ शकते; जिल्हा परिषदेत कोणकोणत्या गटात भाजप बाजी मारू शकतो या गोष्टींवर आकडेबहाद्दरांनी आकडेमोड करण्यास सुरुवात केली.
अगदी एवढेच नव्हे तर खुद्द राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये देखील या परिस्थितीत बदलणाऱ्या समीकरणांविषयी चिंतेचे सूर सुरू झाले. गेल्या दोन अडीच वर्षात राष्ट्रवादीची ताकद कैक पटीने वाढली, मात्र गावागावात दोन गट पडले हे देखील तितकेच खरे! एवढेच नाही, कार्यकर्त्यांचे बाजूला राहू द्यात, विधानसभेला मनापासून साथ देणारे महत्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक बेदखल केले गेले अशी चर्चा कार्यकर्तेच दबक्या आवाजात करू लागले आहेत.
अगदी सोनाई समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, माजी सभापती प्रविण माने यांचीही उदाहरणे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते खाजगी चर्चेत देऊ लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर या कुटुंबाचा राजकीय वावर इंदापूर तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीकडून बेदखल का केला गेला? फक्त कार्यक्रमाच्या फ्लेक्स वरती आणि जाहिरातीतच त्यांची नावे दिसतात; अगदी लाखेवाडीच्या जाहीर पक्ष प्रवेशाच्या वेळी देखील मोठे नेते वगळता स्थानिक नेत्यांनी त्यांची नावेही घेतली नव्हती, त्यांच्याकडे दुर्लक्ष का झाले? गावागावात राष्ट्रवादीचेच दोन गट का निर्माण झाले? पूर्वीचे काही महत्त्वाचे पदाधिकारी दुर्लक्षित का झाले? इथपर्यंत अनेक चर्चा खुद्द राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील करताना दिसू लागले आहेत.
फक्त सत्तापालट झाल्याने राजकारणात फार मोठी फेरपालट होते, असे नाही हा आजवरचा इतिहास आहे, मात्र केवळ भरणे यांच्या राज्यातील राजकीय प्रभावाला तडा गेला म्हणून भाजपचे कार्यकर्ते अगदी आनंदी झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेले हर्षवर्धन पाटील हे येणाऱ्या काळात राज्यपालांच्या बारा जणांच्या यादीतून आमदार होतील अशा विश्वासात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी ही सरकारची खांदेपालट आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. त्यातूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी त्यांची मोर्चेबांधणी आणि जाहीर आकडेवारी आता चौकाचौकात अनेकांच्या तोंडून उमटताना दिसू लागली आहे.