दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. हलक्या स्वरूपात का होईना होत असलेल्या पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागत तसेच ऊस लागवड, बाजरीची पेरणी व इतर पिकांची लागवड करण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जून महिन्यात मान्सून दाखल होऊन राज्यात मुसळधार पाऊस होईल अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाने पुरेशा प्रमाणात का होईना हजेरी लावली. त्यानंतर जून महिना हा कोरडा गेला. मात्र जून महिन्याच्या विश्रांतीनंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात रिमझिम पाऊस पडत असल्याचे चित्र सध्या दौंड तालुक्यात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक शेतकऱ्यांनी मे व जून महिन्यात शेतीची मशागत केली होती. सध्या पेरणी आणि ऊस लागवड करण्यासाठी पुरेसा प्रमाणात का होईना पाऊस झाल्याने शेतकरी ऊस लागवड, बाजरीची पेरणी ,सोयाबीन व इतर पिकांचे लागवडीसाठी लगबग सुरू आहे. दौंड तालुक्यात ऊस शेतीचा मोठा पट्टा आहे. तालुक्यात तीन खाजगी व एक सहकारी असे चार साखर कारखाने आहेत. तर गुऱ्हाळांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पट्ट्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. चार साखर कारखाने व गुऱ्हाळांना पुरून उरेल एवढा ऊस दौंड तालुक्यात उपलब्ध असतो. तसेच श्रीगोंदा कर्जत व बारामती तालुक्यातील साखर कारखाने ही दौंड तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेत असतात. यंदाही शेतकरी ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र दौंड तालुक्यात पहावयास मिळत आहे.
निसर्गाने कृपादृष्टी केल्यास आणि मान्सूनच्या पावसाने अशीच हजेरी लावल्यास तालुक्यातील दुष्काळी भागासह गावा गावातील गावतलाव, बंधारे,नाले, विहिरी यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होईल.परिणामी शेतपिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतपिकांना जीवदान मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.