सातारा महान्यूज लाईव्ह
गेल्या जूनमध्ये अपेक्षित पाऊस न पडल्याने आभाळाकडे टक लावून बसलेल्या बळीराजासाठी पावसाने शुभवार्ता आणली आहे. एकीकडे कोल्हापूर, सांगलीत कदाचित अतिवृष्टी व महापूराचा तडाखा बसण्याची शक्यता असतानाच आता भिमेच्या खोऱ्यातही पावसाला सुरवात झाली आहे.
जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडील माहितीनुसार काल भाटघर धरणक्षेत्रात २४ मिमी पाऊस झाला. निरा देवघर धरणक्षेत्रात ४३ मिमी तर गुंजवणी धरणक्षेत्रात ५९ मिमी पाऊस पडला. त्या तुलनेत घाटमाथा ओलांडून पुढे आलेल्या वीर धरणक्षेत्रात मात्र पावसाची लक्षणे काल नव्हती. अवघा २ मिमी पावसाची नोंद या धरणक्षेत्रात झाली.
मात्र आज पावसाने निराशा केली नाही. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीत पाऊस झाला. पुणे शहरात बुधवारी दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद २३ मिमी झाली असून सर्वाधिक पाऊस लवासा क्षेत्रात पडला. तेथे १६८ मिमी पावसाची नोंद झाली. भोर तालुक्यात ६२ मिमी एवढी नोंद झाली.
माणिकडोह परिसरात २० मिमी, कळमोडी धरण क्षेत्रात १९ मिमी, आंद्रामावळ ४० मिमी, भामा आसखेड २२ मिमी, उजनीच्या धरणक्षेत्रात ४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र जुले महिन्यात पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे.