दौंड : महान्युज लाईव्ह
पावसाळ्यात रोहीत्रांची चोरी करणाऱ्या टोळींचा उपद्रव वाढला आहे. अशा चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांची पथकं सज्ज आहेत, मात्र नागरिकांनीही जागरूक रहावे आणि पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये रोहीत्रे चोरी च्या घटना घडल्या आहेत. यवत पोलीसांनी रोहीत्रांची चोरी करणारी मोठी टोळी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. मात्र ही चोरी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सतर्क होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पावसाचा आणि अंधाराचा फायदा घेऊन हे चोरटे रोहीत्रांची चोरी करीत आहेत. यामुळे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतकरी आणि नागरिकांनी जागरूक रहावे.
आपली वीज ज्या रोहीत्रांवरून आहे, त्या रोहित्रांमधून विद्युतपुरवठा रात्रीच्या वेळी बंद झाल्यास तात्काळ आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांना एकत्र जमा करून सदर रोहीत्रच्या (डीपी) ठिकाणी जाऊन पाहणी करावी. चोरीचा प्रकार असल्यास तत्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.
दरम्यान आपल्या गावात व आपल्या भागात एकूण किती रोहीत्रे आहेत याबाबत माहिती घ्यावी. त्या त्या भागातील विद्युत रोहित्रांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही तेथील संबंधित नागरिकांची असून संशयित चोर मिळून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.