पाऊस.. आनंदाच्याही सरी अन आपत्तीचीही बारी…! या पावसाळ्यात खबरदारी आणि दक्षता कशी घ्याल?

राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह

उन्हाळ्यातील घामाच्या धारांनी बेजार झाल्यानंतर येणारा पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. पाऊस धो-धो बरसायला लागला की नदी-नाले वाहू लागतात, डोंगर-कपारीत धबधबे कोसळू लागतात. सृष्टी हिरवागार शालू नेसते. अशा वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडते. मात्र अशावेळी खबरदारी नाही बाळगली तर ते दुर्घटनेला आमंत्रण ठरते. फक्त भटकंती करणाऱ्यांनीच नाही तर सर्वांनी पावसाळ्यात काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.

पावसाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरित बंद करावीत.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करु नये. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करु नये. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबू, शेड, उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल, तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

माहिती घ्या, अफवा टाळा

पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एसएमएस’चा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करुन ठेवावा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती रेडिओ, टी.व्ही.वर पाहत राहावी. गुरेढोरे, पशुंच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करुन घ्यावी.

आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावी. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावे. जवळपास असलेली निवारा, पक्के घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे.

पूर आल्यास घ्यावयाची खबरदारी

पूर पहायला जाण्याचा मोह टाळावा. पूर परिस्थितीत मदतकार्य सुरू असताना त्यात अडथळा येईल असे वर्तन करू नये. पूर प्रवाहात प्रवेश करू नये. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहावे. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहावे. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा.

पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फूट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खावे. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले, क्लोरीन युक्त पाणी प्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करावा.

पूर ओसरल्यावर आरोग्याची काळजी घ्या

पूर येऊन गेल्यानंतर मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौचालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका.

पूरात जीव धोक्यात घालण्यापेक्षा प्रशासनाच्या सूचनांचे पालन महत्वाचे

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास घरातील वस्तू पलंगावर आणि टेबलावर ठेवा. शौचालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान, सुरक्षित ठिकाणी जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्याबरोबर घ्या. खोल, पाण्यात प्रवेश करू नका, पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा.

जेव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

22 hours ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago