प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर कटरने जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील थरारक घटना!
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात कुरकुंभ परिसरात मळद तलावाजवळ प्रेमसंबधातुन अल्पवयीन मुलीवर कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या प्रेमवीराला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. पुणे- सोलापुर महामार्गालगत हा थरारक घटना घडली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात ही मुलगी बचावली असून तिला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राहुल श्रीशैल निरजे (वय २७, रा. खटाव, जि. सांगली, सध्या रा. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, हे दोघे ही दुचाकीवरुन हडपसर येथुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन कुरकुंभ हद्दीतील मळद तलावा जवळ आले होते.
मुलीच्या घरच्यांनी मागील दोन वर्षांपासून लग्नासाठी चालढकल केल्याने या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून या तरुणाने या मुलीवर कटरने हल्ला करीत गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली. दरम्यान मुलीवर वार करून तो तरुण पळून जात असताना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांनी कळविले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन उसाच्या शेतात या तरुणाला पकडले. पोलीसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.