मुंबई : महान्यूज लाईव्ह
विविध वृत्तवाहिन्यांवर ‘ सरल वास्तू ‘ या नावाने प्रसारित होत असलेल्या कार्यक्रमातून देशभरात प्रसिद्धीस आलेले चंद्रशेखर अंगडी अथवा चंद्रेशेखर गुरुजी यांची कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये हत्या झाली आहे. त्यांच्या या हत्येने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेल येथे ही घटना घडली. काही व्यावसायिक बैठकीनिमित्ताने गुरुजी या हॉटेलमध्ये आले होते. या हॉटेलच्या लॉबीत दोघेजण त्यांना भेटायला आले. पहिल्यांदा त्यांच्या पाया पडून नंतर त्यांनी गुरुजींवर चाकुने हल्ला चढविला.
सीसीटिव्हीत कैद झालेल्या घटनेत हे दोघे अनेकवेळा त्यांच्यावर चाकुने वार केलेले दिसत आहेत. आजुबाजूचे काही लोक त्यांना वाचविण्यासाठी धावलेही, पण या दोघांनी त्यांना धमकावून जवळ येऊ दिले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चंद्रशेखर गुरुजींना तातडीने केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे.