विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : जाईन गे माय तया पंढरपुरा.. भेटीन माहेरा आपुलिया… पंढरीच्या विठोबारायाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणारे सायकल स्वारही आषाढी वारीत सहभागी होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत हा पायंडा पडत आहे. यंदा तर राज्यभरातून सुमारे दीड हजार सायकल पटूंनी पंढरपूर वारी केली. बारामतीतील 111 जणांनी बारामती ते पंढरपूर ही सायकलवारी केली.
आषाढी वारीनिमित्त पर्यावरण संतुलन, शारीरिक समृद्धी, महत्व याकरिता पंढरपूर श्री विठ्ठल दर्शन, सायकल प्रदक्षिणा, सायकल रिंगण असा उपक्रम करण्यात आला. ही रॅली २ व ३ जुलै रोजी झाली. या सायकल वारीमध्ये बारामती सायकल क्लबचे १११ सदस्य सहभागी झाले होते.
बारामती- पंढरपूर हे ११० किलोमीटर अंतर पार करण्यात आले. यावेळी सायकल रिंगण करून भजन, विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण संतुलन बाबतीत सायकलिंगचे महत्व याचा प्रसार करण्यात आला. या रॅलीमध्ये बारामती सायकल क्लबने १११ जणांनी भाग घेतला. भविष्यात जास्तीत जास्त जणांना सहभागी करून घेण्याचा निर्धार बारामती सायकल क्लबच्या वतीने करण्यात आला.