अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यात नव्याने तब्बल 354 रेशन दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत ही रेशन दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार असून जे पहिल्यांदा अर्ज करतील अशा बचत गटापासून स्वयंसेवी संस्था पर्यंतच्या संस्थांना ही दुकाने मिळतील त्यामुळे 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याची संधी आहेत त्यामुळे त्वरित अर्ज करा.
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील सध्या रद्द असलेले, यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले अथवा लोकसंख्या वाढीमुळे नव्याने मंजूर होणारे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात आवश्यक असणारे 354 रास्तभाव दुकाने नव्याने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 2 फेब्रुवारी 2022 च्या शासन परिपत्रकानुसार रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा कालावधी देण्यात आला असून त्या अंतर्गत पुणे जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
त्यानुसार बारामती तालुक्यात 8 गावे, मावळ तालुक्यातील 38 गावे, खेड तालुक्यातील 23 गावे, आंबेगाव- 21 गावे, इंदापूर- 6 गावे, वेल्हे- 75 गावे, जुन्नर- 23 गावे, पुरंदर- 18, दौण्ड- 8 गावे, हवेली- 24 गावे, भोर- 66 गावे, शिरुर- 14 गावे आणि मुळशी तालुक्यात 30 गावात याप्रमाणे एकूण 354 गावात स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूर करण्यात येणार आहेत.
कोण करू शकेल अर्ज? कोणाला प्राधान्याने मिळू शकतात स्वस्त धान्य दुकाने?
ज्या गावासाठी अथवा भागासाठी हे दुकान देण्यात येणार आहे अशा भागातील ग्रामपंचायत अथवा स्थानिक स्वराज्य संस्था, तेथील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था याप्रमाणे प्राधान्यक्रम असणार आहे.
या दुकानांकरिता संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये 10 रुपये किमतीला अर्ज उपलब्ध होतील. स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाचा नोटीस फलक, सर्व तहसीलदार, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाचा नोटीस फलक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचा नोटीस फलक येथे प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर https://pune.gov.in/notice/fair-price-shop-manifesto/ या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील अटी, शर्ती, कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावेत.
शासन निर्णयानुसार इच्छुक संस्था, गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये मुदतीत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
I am ready