मुंबई : महान्यूज लाईव्ह
कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे माणसांचे सगळे जग थांबून राहिले होते. कोरोनाच्या या झटक्याने अजून माणसांच्या आयुष्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आहे.
पण कोरोनासारखे संकट फक्त माणसांवरच येते काय ? प्राणी, पक्षी आणि किटकांवरही असे संकट कोसळते. सध्या जगभरातील मधमाशांवर हे संकट कोसळले आहे. हे संकट ऐवढे भीषण आहे की मधमाशांना यापासून वाचविण्यासाठी देशोदेशीच्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. व्हॅरोआ माइट नावाच्या परजीवी किटकाने मधमाशांवर केलेले आक्रमण या संकटाला कारणीभूत आहे. अगदी तिळाच्या आकाराचा एक किटक जरी पोळ्यातील एखाद्या मधमाशीच्या अंगाला चिकटला तरी तो संपूर्ण पोळे उद्धस्त करू शकतो. हा किटक प्रथम त्या मधमाशीचे शोषण करण्यास सुरुवात करतो. यातून ती मधमाशीची क्षमता कमी होते आणि ती अर्धमेली होती. अगदी थोड्याच काळात या किटकांची संख्या प्रचंड वाढते आणि पोळ्यातील सगळ्या मधमाश्या या किटकाच्या आक्रमणाला बळी पडतात.
खरेतर मधमाशा या एक समाज म्हणून जगतात. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या मधमाशीला आपल्याला असा संसर्ग झाल्याचे लक्षात येते, त्यावेळी ती मधमाशी त्या पोळ्यातील इतर मधमाशांपासून दूर जाते, म्हणजेच सोशल डिस्टंसिंग करते. परंतू या व्हॅरिओ माइट इतका झपाट्याने आक्रमण करतो की या सोशल डिस्टंसिंगचाही सध्या फारसा उपयोग होत नाही.
सध्या जगभर या किटकाने मधमाशांवर हल्ले चढवून मधमाशांचे हे जग संपवून टाकण्याचा जणू विडाच उचलला आहे. याची सगळ्या मोठी झळ पोचली आहे ती ऑस्ट्रेलिया या देशाला. ऑस्ट्रलिया हा मधाची निर्यात करणारा जगातील प्रमुख देश आहे. मधमाशांच्या लक्षावधी वसाहती ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. परंतू या संकटामुळे ऑस्ट्रेलिया आपल्या देशातील असा संसर्ग झालेल्या हजारो वसाहती नस्ट करून टाकत आहे.
ज्या वसाहतींपर्यंत या किटकाचे आक्रमण पोचलेले नाही, त्या वसाहती सांभाळण्यासाठी आता आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये माणसांच्या जगात वापरले गेलेले ‘ लॉकडाऊन ‘ सारखे उपाय वापरले जात असून या वसाहतींचा जगाशी असलेला संपर्क तोडण्यात येतो आहे. दोन आठवड्यापूर्वी सिडनी येथे या परजीवी किटक आढळून आल्याने ऑस्ट्रलियातील मध व्यावसायिक दहशतीखाली आले आहेत. जर या किटकांनी ऑस्ट्रेलियातील मध वसाहतींवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला तर या व्यावसायिकांना किमान सात कोटी डॉलरचा फटका बसण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम केवळ मध उत्पादनावर होणार नाही, तर इतर अनेक पिकांच्या उत्पादनावरही होणार आहे. जी पिके परागीकरणासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत, त्या पिकांनाही याचा मोठा झटका बसणार आहे.