जळगाव : महान्यूज लाईव्ह
कोंबडी पळाली तंगडी धरून हे गाणे अगदी साता समुद्रा पार पोचले पण जळगाव जिल्ह्यात खरोखरच कोंबडीला तंगडी धरून पाळावे लागले आणि ही वेळ शेजाऱ्याने आणली पण शेजाऱ्याने कोंबडीची तंगडी तोडल्याने आता थेट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील सिद्धार्थनगर भागात घडली आहे. येथे राहणाऱ्या सुनिता जाटुले नावाच्या महिलेने कोंबड्या पाळल्या आहेत. आता कोंबडीच ती! कुठेही फिरणार! कुठेही घाण करणार! त्यामुळे शेजारीपाजारी देखील वैतागले होते. पण कशाला नादाला लागायचे म्हणून सारे जण शांत होते.
मात्र सतत कोंबडी घरासमोर येते आणि घाण करते म्हणून वैतागलेल्या शेजाऱ्याने काठी घेतली आणि कोंबडीला मारले. या काठीच्या तळ्यात कोंबडीचा पाय तुटला. कोंबडीचा पाय तुटताच कोंबडीची मालकीण सुनिता हिने कोंबडी कडे धाव घेतली कोंबडीला मारण्यावरून शेजाऱ्या बरोबर दोघींचा वाद झाला.
मग सुनिता जाटोले ही महिला पाय तुटलेल्या कोंबडी सह पोलीस ठाण्यात पोचली. आपल्या जखमी झालेल्या कोंबडीच्या या अवस्थेत जबाबदार असणाऱ्या शेजाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिने पोलीस ठाण्यात केली. अर्थातच पोलिसांनाही या घटनेची दखल घ्यावी लागली आणि पोलिसांनी शेजाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. या तंगडी धरून पडलेल्या कोंबडीची चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू आहे. आता नेमके पोलीस काय भूमिका घेतात आणि शेजाऱ्याला काय शिक्षा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.