घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही वर्षापासून वादाचे केंद्र बनलेल्या पुणे बेंगळूर महामार्गावरील खेड शिवापूरचा टोल नाका आता स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
पुणे व भोर तालुक्यासह वेल्हे पुरंदर तालुक्यातील वाहन चालकांना 25 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 80 किलोमीटरचा टोल द्यावा लागतो याबद्दल टोलनाका कृती समितीचे गेल्या काही महिन्यांपासून येथे आंदोलन सुरू आहे. ज्या महामार्गाच्या कामाचे टेंडर 2010 रोजी झाले होते, त्याचे काम हे 2012 पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली, मात्र 10 वर्षांपासून अद्याप काम पूर्ण झाले नाही, असाही आरोप या समितीने केला होता.
यासंदर्भात कृती समितीने खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पाठपुरावा केला. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी अनेकदा चर्चा केली. या संदर्भात गडकरी यांनी देखील प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात सूचना केली होती. दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात केंद्र सरकारकडे टोलनाका स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना कृती समितीचे ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले, आम्ही गेले दहा वर्षापासून या संदर्भातील पाठपुरावा करत आहोत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या संदर्भात अनेकदा मागणी देखील करण्यात आली. वास्तविक पाहता वीस किलोमीटरच्या टप्प्यासाठी आम्ही 80 किलोमीटरचा टोल गेल्या काही वर्षांपासून भरत आहोत.
आनेवाडी ते खेड शिवापूर हे अंतर 74 ते 75 किलोमीटरचे आहे. वास्तविक पाहता टोल नाका हा 60 किलोमीटरच्या अंतरात असावा असा नियम आहे. त्यामुळे आम्ही पुणे जिल्ह्यातील वाहनांसाठी या संदर्भात सवलत मागत होतो. मात्र ती मिळत नव्हती. हा टोलनाका भोर फाट्याच्या पुढे गेल्यास पुणेकरांची या जाचातून सुटका होईल. गेली काही वर्ष या संदर्भातील प्रस्ताव देखील पाठवला जात नव्हता, मात्र आता एकदाचा हा प्रस्ताव पाठवला गेला आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माहिती दिली आहे. आता मात्र लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून तातडीने हा प्रश्न मार्गी लागावा लावावा अशी अपेक्षा आहे.