देशाच्या पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने त्याची दखल घ्यावी.. कोणाच्याही अध्यात ना मध्यात असणाऱ्या माणसाचा विचार करावा अशी किमया एका साध्या मेंढपाळाने केली आहे. हा 85 वर्षीय मेंढपाळ देशातील नाही रे वर्गासाठी जळजळीत अंजन घालणारा आणि ज्यांना काहीतरी करून दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरला आहे.
कर्नाटकातील दासनादौडी गावातील ८५ वर्षांच्या साध्या धनगर मेंढपाळाची.. के.रे. कामेगौडा या मेंढपाळाची कहाणी..! बकऱ्या चारता चारता एकाला एक जोडून 14 तलावांची साखळी निर्माण केली आणि परिसरात नंदनवन फुलवण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर 2000 वडाच्या झाडांची उभारणी केली अशा या कामेगौडांची ही कहाणी..!
अनेकांना डोंगर खोदून रस्ता तयार करणारे दशरथ माझी आता माहीत असतीलच..तर या कामेगौडांची पण कहाणी जरा हटके आहे. कामेगौडा यांच्याकडे बकऱ्या आहेत. ते गेली 40 वर्ष या बकऱ्या चारण्याचे काम करतात. कुंदिनीबेट्टा या गावच्या हद्दीत पाण्याची कमतरता भासायची. तेव्हा त्यांनी पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी कामाला सुरुवात केली, कोणालाही न सांगता!
आपण करत असलेले काम म्हणजे काहीतरी अभूतपूर्व आहे, असा कसलाही अभिनवेश न ठेवता कामेगौडा काम करत राहिले. पहिल्या तलावात पावसाळ्यात पाणी साचले आणि त्यांच्या आनंदाला महापूर आला.
केलेल्या कामाची चीज झाले असे समजत या माणसाने मागे वळून पाहिलेच नाही. गेल्या 40 वर्षात त्यांनी 14 तलाव खोदले. आता हे 14 तलाव करताना त्यांना खर्चाचा प्रश्न नक्की उभा राहिला असेलच! मग अशावेळी त्यांनी काय केले माहिती आहे का?
त्यांनी आणखी एक गोष्ट केली. ते म्हणजे आपल्याकडील काही बकऱ्या विकल्या. त्या पैशातून अवजारे घेतली आणि त्यातून तलाव खोदायचे काम सुरू केले. 2017 पर्यंत या माणसाने सुरुवातीला काठीने, पहारीने तर नंतर औजाराने छोटे छोटे तलाव खोदले. त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि हळूहळू सुरुवातीला टिंगल टवाळी करणारे लोक त्यांच्या कामात सहभागी झाले.
लोकसहभाग वाढत गेला. या माणसाची वाहवा झाली. लोक जोडले गेले आणि हळूहळू फक्त पाच वर्षात पुन्हा आठ तलाव खोदले गेले. हे तलाव लोकसहभागातून खोदले गेले आणि पाहता पाहता या भागात एकूण 14 तलाव खोदले. या तलावांचा स्वतःला काय उपयोग होणार आहे? याचा कोणताही विचार न करता, जी माणसं निरपेक्ष वृत्तीने काम करतात ती, दुसऱ्या पिढीला फळे देतात. कामेगौडा यांनी हेच केले.
कामेगौडा आजही झोपडीत राहतात आणि आजही दिवसभर या तलावाची आणि झाडांचीच निगा राखतात. रात्री उशिरा ते घरी जातात. दिवसभर त्यांचं मन या तलावांमध्ये आणि झाडांमध्ये रमतं. वयाच्या 85 व्या वर्षी देखील ते हेच काम अगदी निरपेक्ष वृत्तीने करत आहेत.
गावकऱ्यांना त्यांचा अभिमान वाटतोच आहे, पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात मध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख केला. खरंतर अशी माणसे आहेत म्हणूनच आरेपासून ते ॲमेझॉन पर्यंत पर्यावरणाचे नुकसान होत असतानाही आपल्या नव्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचा आदर्श निर्माण करता येतो. अशी माणसं कदाचित आपल्या देखील अवतीभवती असतील! आपण त्यांना शोधण्यास कमी पडतो आणि त्यांच्या कामाचा आदर्श घेण्यास विसरतो बाकी काही नाही..!