पुणे : महान्यूज लाईव्ह
रॉटविलर हा अत्यंत तापट कुत्रा नागरी वसाहतीत पाळण्यास बंदी आहे. मात्र हा कुत्रा इतर सामान्य माणूस नव्हे, तर चक्क निवृत्त एसीपीना चावला. मग काय, यात साहेब गंभीर जखमी झाले. त्यांनी फिर्याद दाखल केली. मग पोलिसांनीही कुत्र्याचा मालक आणि त्याचा बाप या दोघांवर गुन्हा दाखल केला.
ही घटना पुण्यातील उच्चभ्रू समजणाऱ्या बाणेर परिसरात घडली. बाणेर येथील वीरभद्र नगर परिसरातील तिसऱ्या गल्लीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर हे त्यांच्या कुत्र्यासह जात असताना घडली.
कलगुटकर हे त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. त्यावेळी या गल्लीतील तुषार भगत यांनी त्यांचा रॉटविलर जातीचा कुत्रा मोकळा सोडला होता. रॉटविलर कुत्र्याने कल कोटकर यांच्या समवेत असलेल्या कुत्र्याला पाहिले आणि त्याचा राग डोक्यात गेला.
त्याने त्या कुत्र्यावर हल्ला केला आणि पाठोपाठ कलगुटकर यांनाही चावे घेतले. यात कलगुटकर आणि त्यांचा कुत्रा दोघेही गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर कलगुटकर यांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रॉटविलर कुत्र्याचा मालक तुषार भगत आणि त्याच्या वडीलावर गुन्हा दाखल केला.