मुंबई : महान्यूज लाईव्ह
चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर अजूनही शिवसेना सावरलेली नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल खेडचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची काल रात्री हकालपट्टी करण्यात आली. ही हकालपट्टी उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली, तर आज सकाळी ही अनावधानाने आलेली बातमी असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी झालेली नसल्याचे शिवसेनेकडूनच स्पष्ट करण्यात आले.
खेडचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली होती. या पोस्टची अत्यंत गांभीर्याने दखल शिवसेना नेतृत्वाने घेतली. काही दिवसांपूर्वीच आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेलाच घरचा आहेर दिला होता.
या दोन गोष्टींची गंभीर दखल घेत शिवसेना नेतृत्वाने आढळराव पाटील यांची पक्षातून हाकालपट्टी करत असल्याचे स्पष्ट केले. मात्र एकीकडे शिवसेनेच्या चिन्हावर आणि शिवसेना पक्षावरच बंडखोर गट दावा करत असताना आपल्याच कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आता पक्षातून हाकलले तर पक्षाचे नुकसान होईल अशा स्वरूपाची चर्चा झाल्यानंतर शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आली.
आज सकाळी शिवसेना पक्ष सचिवांनी आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आलेली नाही. ते आढळराव शिवसेनेतच आहेत असे स्पष्ट करत यामध्ये सारवा सर्व केली. मात्र यानंतर खुद्द आढळराव यांनी देखील नाराजी व्यक्त करत शिवसेनेत माझी काय किंमत आहे ते कळाले अशा स्वरूपात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.