चंदिगड: महान्यूज लाईव्ह
पंजाब मध्ये मुख्यमंत्री भगवंत माने यांच्या आप सरकारने महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची सुरुवात एक जुलैपासून झाले असून आता या पुढील काळात प्रत्येक दोन महिन्याला सहाशे युनिट पर्यंत वीज मोफत दिले जाणार आहे. वीज ग्राहकांना 0 बिलाचे वीज बिल मिळणार आहे. एवढेच नाही तर 31 डिसेंबर 2021 पूर्वीचे जे थकीत वीज बिल आहे ते पण माफ करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
शुक्रवारपासून याची सुरुवात झाली. पंजाब मध्ये यापूर्वीच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता प्रत्येक नागरिकाला 300 युनिट पर्यंत वीज मोफत पुरवण्याचा निर्णय आप सरकारने जाहीर केला होता, त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
अर्थात दोन महिन्यात सहाशे युनिट पेक्षा जास्त वीज वापरल्यास त्या वीज ग्राहकाला मात्र 600 युनिट सह सर्व वीज बिल भरावे लागणार आहे. थोडक्यात मर्यादित वीज वापर असलेल्या ग्राहकांना ही वीज मोफत मिळणार आहे.
पंजाब मधील 62 लाख 25 हजार वीज ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. कारण या ग्राहकांचा प्रति महिन्याचा वीज वापर 300 युनिट पेक्षा कमी आहे. पंजाब मध्ये 73 लाख 80 हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 62 लाख 25 हजार ग्राहकांना याचा लाभ होईल.
पंजाब सरकार यापूर्वीपासूनच विविध श्रेणीतील वीज ग्राहकांना दरवर्षी चार हजार कोटी रुपये वीजबिलाचे अनुदान देते. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्ग प्रवर्ग आणि दारिद्रय रेषेखालील प्रवर्गातील कुटुंबांचा समावेश आहे. आता ही अनुदानाची रक्कम 5500 कोटी वर पोहोचणार आहे.