नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील प्राचीन असे देवस्थान आहे. १२ ज्योतिर्लिंगांमध्येही या स्थानाचा समावेश होतो. या मंदिरातील पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनीही या घटनेला दुजारा दिला आहे.
या घटनेमुळे हा देवाचा चमत्कार असल्याच्या अफवांनी जोर पडकडा आहे. दुसरीकडे पिंडीवर बर्फ जमा होणे हा अगदी नैसर्गिक प्रकार असल्याचे वैज्ञानिक सांगत आहेत. या पिंडीवर मधोमध एक फूट खड्डा आहे. यात सातत्याने गोदावरी नदीचे उगमाचे पाणी पडत असते. त्याचबरोबर भाविकांनी वाहिलेले दूध किंवा इतर दिवशी केलेला अभिषेक यामुळे हा खड्डा सतत भरलेला असतो. वातावरणात तापमानात घट झाल्याचा परिणाम म्हणून हे बर्फाचे गोळे तयार झाले असावेत असे नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणले आहे. हा संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असून याचा दैवी चमत्कार किंवा दैवी संकेत समजू नये असे आवाहनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले आहे.
परंतू आता १९६२ मधील भारत चीन युद्धादरम्यान असाच बर्फाचा थर येथे जमा झाला असल्याचा दाखला भाविकांकडून दिला जातो आहे. ईशान्य भारतात आसाममध्ये आलेल्या पूरानंतर शंकराच्या पिंडीवर अशाच पद्धतीने बर्फ जमा झाल्याचेही सांगितले जाते आहे. यामुळे आता हा कोणत्या चमत्काराचा दैवी संकेत आहे याचे आडाखेही अनेक ज्योतिषी आणि धार्मिक विव्दानांकडून दिले जातील यात कोणतीच शंका नाही.