घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
‘नसरापूर म्हणजे कॉग्रेस, कॉग्रेस म्हणजे नसरापूर’ हे समीकरण येथील गावाने कायम जपला आहे. अशा गावच्या वतीने झालेला सत्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नसरापूरच्या सर्वागीण विकासासाठी निधी देण्यात कायम झुकते माप असेल’ अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल लेकावळे यांनी दिली.
मोहरी ( ता. भोर ) येथील कॉग्रेसचे युवक कार्यकर्ता राहूल लेकावळे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नुकतेच नसरापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लेकावळे बोलत होते.
यावेळी सरपंच रोहिणी शेटे, ग्रामसेवक हरिभाऊ पवार, सदस्या सपना झोरे, अश्विनी कांबळे, ज्ञानेश्वर झोरे, अनिल शेटे, लक्ष्मण शेटे, भरत शेटे, अरुण झोरे, संतोष कदम, हनीफ शेख, नंदकुमार काजळे, राजू मिठाले, सनी गवळी, माजी उपसरपंच शंकर शेटे, रामचंद्र शेटे, लक्ष्मण लेकावळे उपस्थित होते.
माझे आजोबा गुलाबराव लेकावळे यांच्या काळापासून लेकावळे परिवार आजही थोपटे घराण्याबरोबर कायम आहे. पक्षाकडे स्वतःहून कधी काही मागायचे नाही. या आजोबांची शिकवणीप्रमाणे आम्ही पक्षाचे काम करत आहोत. आमदार संग्राम थोपटे यांनी माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड केली असून संधीचे सोने करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी नसरापूरमधील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आदर्श विस्ताराधिकारी महेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य इरफान मुलाणी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड तसेच राज्याच्या वारकरी महामंडळ कार्याध्यक्षपदी सतीश वाल्हेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार देखील करण्यात आला. पुढील जीवनात सामाजिक आणि विधायक कामावर भर देणार असल्याचे महेश दळवी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत शेटे यांनी केले. आभार सरपंच रोहिणी शेटे यांनी मानले.