मुंबई : महान्यूज लाईव्ह
नाट्यमय घडामोडीनंतर काल संध्याकाळी अखेरीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांनी तातडीने कामकाजास सुरुवातही केली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता सुप्रीम कोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे शिवसेनेपुढच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उद्याची बहुमत चाचणी रद्द करावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतू सुप्रीम कोर्टाने या मागणीवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता उद्याच्या बहुमत चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या सरकारमधील १६ जणांवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निलंबनाची नोटीस बजावली आहे. ज्यांच्यावर निलंबनाची नोटीस बजावली, त्यांना बहुमत चाचणीची परवानगी देऊ नये यासाठी सुनील प्रभूंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाबाबत ११ जुलै रोजीच सुनावणी होईल असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.