तुषार शेंडे, इंदापूर
जागतिक कृषीदिन विशेष
कधी कधी आयुष्यात असंख्य अनावश्यक धक्के बसतात, नको ती अस्वस्थता येते, निराशा येते, मन खचून जाते, काही करावे काही सुचत नाही आणि अशातच काही माणसे कायमस्वरूपी खचून जातात तर काही आयुष्यात संपवायला निघतात तर काही अशा बिकट परिस्थितीतही प्रकाशाची वाट शोधण्याचा प्रयत्न करतात आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्यासाठी धडपडतात.
निश्चय करून कामाला लागतात आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या परिस्थितीत आपल्या निश्चयाच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर क्षणार्धात सर्व काही बदलून टाकतात…यशाची एक वेगळी उंची गाठतात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील धडपडणाऱ्या लोकांसाठीही प्रेरणास्त्रोत बनतात…
एवढे सगळे सांगायचे कारण म्हणजे मागच्या पाच वर्षापासून नोटबंदी, अतिवृष्टी, कोरोना या सर्व नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेले छोटे उद्योग, नोकऱ्या आणि शेती… त्यामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती आणि खचलेला समाज. पण अशा परिस्थितीतही वरकुटे खुर्द गावातील मिसरूड फुटलेल्या एका तरुणाने शेतीत केलेले प्रयोग आणि अल्प भांडवलात जुगाड करून साधे शेडनेट उभारून 30 गुंठ्यात 30 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन बारा लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे…
होय ही बातमी नसून ही या युवकाच्या प्रयत्नांची यशोगाथा आहे. ही त्याची संघर्ष गाथा आहे. खचून गेलेल्या हृदयांमध्ये प्रयत्नांचे आणि संघर्षाचे बीज प्रेरणारी ही स्टोरी आहे वरकुटे खुर्द येथील गणेश गोविंद शेंडे याची…!
आज जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने त्याच्या शेतीतील या प्रयोगाचा आणि त्यातून मिळवलेल्या विक्रमी उत्पादनाचा आढावा घेणारी ही यशोगाथा. गणेश हा वरकुटे खुर्द येथील नागोबा मळा वस्ती वरती राहणारा एक पंचविसीतला एक युवक. वडिलांच्या आजारपणामुळे बारावीपासूनच त्याच्या खांद्यावर घराची जबाबदारी पडली. पुढील शिक्षण त्याने मुक्त विद्यापीठातून घरची शेती बघत बघत पूर्ण केले.
आज तो बी.ए. आणि बीएससी ॲग्री झाला आहे. गणेश हा 19 वर्षांचा असताना त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरवले आणि संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी त्याच्यावरती पडली. सोबत त्याची आई विमल, धाकटी बहिण सीमा आणि एक विवाहित बहिण वर्षा असा त्याचा परिवार. संपत चाललेल्या डाळिंब बागा आणि तीन एकर शेतीत उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न सतावत असतानाच सप्टेंबर 2019 मध्ये गणेशने बांबूंच्या आधारे दोन गुंठे क्षेत्रामध्ये शेडनेट उभा केले.
हे अतिशय साधे शेडनेट होते आणि त्यामध्ये त्याने ढोबळी मिरचीची लागवड केली. मिरचीची लागवड व्यवस्थापन व शेडनेट उभारणीचा खर्च पकडून त्याला 20000 रुपये खर्च आला आणि 43 हजारांचे उत्पन्न मिळाले. प्रयोग यशस्वी झाला आणि गणेशने हा प्रयोग जास्त क्षेत्रावर करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर कोरोना आल्याने एक वर्ष गणेश शांत बसला व ऑक्टोबर 2021 मध्ये लॉकडाऊन नंतर बांबू, तार व साध्या नेट च्या मदतीने गणेशने 30 गुंठे क्षेत्रावर साध्या शेडनेटची उभारणी केली. हे शेडनेट उभारण्यासाठी त्याला दोन लाख 25 हजार रुपये इतका खर्च आला. एक नोव्हेंबर 2021 ला मशागत पूर्ण करून त्याने या शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आणि 16 डिसेंबरला पहिली तोडणी झाली.
16 डिसेंबर पासून आजतागायत प्लॉट सुरू असून साडेसहा महिन्यांमध्ये आत्तापर्यंत 30 टन मिरचीचे उत्पादन मिळाले असून अजून दोन ते तीन टन उत्पादन मिळण्याची शाश्वती आहे. म्हणजे जवळपास एक गुंठ्यात एक टनाहून अधिक मिरचीचे विक्रमी उत्पादन गणेशने मिळवले आहे. सुदैवाने त्याला 25 रुपये प्रति किलो पासून 70 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला असून आत्तापर्यंत 12 लाखाहून अधिकचे उत्पादन 30 गुंठ्यात मिळाले आहे.
शेडनेटसहित पीक व्यवस्थापनाचा खर्च चार लाख रुपये एवढा झाला असून आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा गणेशने मिळवला आहे. गणेशकडे साडेतीन एकर शेतजमीन असून त्यामध्ये डाळिंबाची शेती तो करायचा. परंतु मर आणि तेल्या रोगाने बागा संपल्याने तो या प्रयोगाकडे वळाला आणि अल्प भांडवलावर देशी जुगाड करून त्याने शेडनेट उभारून उच्चांकी उत्पन्न मिळवले आहे.
एकीकडे शेती आणि शेतकरी शेतीतील असंख्य समस्यांमुळे व तोट्याच्या शेतीमुळे रसातळाला जात असताना सर्वसामान्य कुटुंबातील अशी मुले नफ्याच्या शेतीचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. पुढार्याच्या ओळखीने आणि पैशाच्या जोरावर उत्कृष्ट शेतीचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची संख्या आज प्रचंड आहे.
पण एखाद्या खेडेगावातील वाड्या वस्तीवर असे निरनिराळे प्रयोग राबवून फायद्याची शेती करणारे युवक आज खरे कृषीनिष्ठ असून तेच खऱ्या अर्थाने या पुरस्कारांचे मानकरी आहेत. आज जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने महान्यूज ने गणेशच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचा आढावा घेतला असून गणेशला कृषीतील त्याच्या पुढील प्रवासासाठी महान्यूज कडून खूप खूप शुभेच्छा…!