भोर : महान्यूज लाईव्ह
रायगडकडे जाण्यासाठी व भोर मधून कोकणात उतरण्यासाठी सर्वांना अतिशय महत्त्वाचा व जवळचा पर्याय असलेला वरंधा घाट वाघजाई मंदिरानजिक दरड कोसळल्यानंतर धोकादायक बनल्याने आता तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भोर- महाड मार्गावरील वरंधा घाट आज पासून अवजड व मोठ्या वाहनांसाठी पुढील तीन म्हणजे महिने 30 सप्टेंबर पर्यंत बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या काळात म्हणजे रेड आणि येलो अलर्टच्या वेळी सर्व वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसापूर्वीच वरंधा घाटातील वाघजाई मंदिरानजिक दरड कोसळून एक जण गंभीर जखमी झाला होता. या भागात सातत्याने दरडी कोसळत आहेत. घाटमाथ्यावरील दगड ठिसूळ बनल्याने दरडी कोसळत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या संदर्भातील सर्व कामे पूर्ण करावीत अशी नागरिकांनी मागणी केली आहे.