मुंबई : महान्यूज लाईव्ह
अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेहनत घेऊन शिवसेना फोडल्यानंतर भाजपच्या ताब्यात जे सरकार आलं, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे सर्वांना अपेक्षित होतं. मात्र काल भल्या भल्यांच्या अटकळींना कात्रजचा घाट दाखवत अनेक घडामोडी घडल्या. अनपेक्षित रित्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तर सुरुवातीला मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं..!
दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या लाटेला मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीस यांनी मारला असे सांगणाऱ्या माध्यमातील पत्रकारांना देखील संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर धक्का बसला. या संपूर्ण घटनेला कारण होते, उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह आणि त्यानंतरचा त्यांनी सादर केलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा..!
मध्यरात्री राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर समाजमाध्यमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूतीची प्रचंड लाट उसळली. ही लाट तेवढी तीक्ष्ण होती की, मुंबईच्या कॉम्प्लेक्स पासून पंढरीची वाट धरलेल्या वारकऱ्यांच्या मोबाईल पर्यंत सोशल मीडियावर प्रत्येकाच्या स्टेटसवर उद्धव ठाकरे होते.
उद्धव ठाकरे यांनी जनतेशी मुक्त संवाद साधताना, त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली आणि त्यामध्ये कोरोनाच्या कालखंडाचा देखील आढावा घेतला. साहजिकच कोरोनाच्या काळात काहीच काम झाले नाही, याविषयीची महाविकास आघाडी विषयीची सामान्यांमधील नाराजी अगदी काही क्षणात भावनिकरित्या संपली. उद्धव ठाकरे यांना परक्यांनीच नव्हे, तर त्यांचे म्हणवणाऱ्यांनी देखील त्रास दिल्याची भावना यावेळी सर्वांच्याच मनात आली आणि त्यानंतर दिवसभर उद्धव ठाकरे यांचे भाषण तुमच्या लहानग्यांना दाखवा अशा स्वरूपाचे स्टेटस प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसू लागले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांना विरोध होणार होता की नाही माहित नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यातही कुरघोडी करत कोणत्याही शिवसैनिकांनी बाहेर येऊ नका, त्यांना त्यांचा विजय साजरा करू द्या अशा स्वरूपाचे केलेले वक्तव्य देखील अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचे ठरले. यातच मुंबईत पॅरा मिलिटरी फोर्स, केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या येणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी या भावनेतेच्या रागाला आणखी एक फोडणी दिली.
त्यानंतर मात्र अगदी काल सकाळपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार असे ठामपणे सांगणाऱ्या व तसेच घडेल याची खात्री असणाऱ्या अनेकांना दुपारच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात झालेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेने मोठा धक्का दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्या या पवित्र्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कुरघोडी केली आणि एका दगडात अनेक पक्षी मारले, त्यांनी एकाच वेळी शिंदे यांचे नाव पुढे करून शिवसैनिकांची सहानुभूती घेतली. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पूर्णपणे थंडगार केले, अशी लागलीच चर्चा सुरू झाली आणि ते खरेही होते.
कारण ज्या मुख्यमंत्रीपदासाठी अथवा सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस गेले अडीच वर्ष सावधपणे व्यूहरचना करत होते, तिला अचानक तडा जाणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. तर यामागे प्रचंड मोठा राजकीय मेंदू वापरलेला आहे याची जाणीव अनेकांना झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा सुरू झाली.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात असणार नाहीत हे त्यांनी स्वतःच जाहीर केल्यानंतर काही वेळातच पुन्हा कुजबूत सुरू झाली आणि इकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना फोन केले. ही सर्व घटना अगदीच राजकीय व्यूहनितीचा भाग होता असे नाही हे आता समोर आले आहे.
मुंबईतील राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार ज्या मुंबई महापालिकेसाठी भाजपची प्रचंड चढाओढ सुरू आहे. त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता निर्माण झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या सहानुभूतीचा फटका बसेल. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, तर राज्यात अवघ्या काही दिवसात नाराजीची तीव्र लाट उसळेल आणि हे सगळे केवळ सत्तेसाठी भाजपने केल्याचा राग सामान्य माणसाच्या मनात राहील, त्याचा परिणाम भाजपलाही सोसावा लागेल असे भाजपच्या राज्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या नेत्यांना लक्षात आले.
देशातील इतर राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात मात्र अस्मितेला फार महत्त्व आहे. मलिक अंबर पासून काल-परवा पावसात भिजलेल्या शरद पवार यांच्यापर्यंत इतिहासाचा धांडोळा घेतला, तर महाराष्ट्रात अस्मिता फार महत्त्वाची असते आणि महाराष्ट्रात अजूनही पुरोगामी विचार तग धरून आहे.
त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांनंतरही मराठा साम्राज्य तग धरून राहिले. अस्मितेला हात घातला की महाराष्ट्र पेटून उठतो, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि इथे आकस आणि द्वेषाने राजकारण करता येत नाही. त्यामुळे जे मध्य प्रदेशात घडले, जे बिहार, उत्तरेकडे घडले ते महाराष्ट्रात घडेलच असे नाही.
भाजपाला शिवसेना बंडखोर नेत्यांची साथ हवी आहे, ती मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी! परंतु ही सत्ता अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतली असा समज सामान्य मतदारांच्या व शिवसैनिकांच्या मनात राहू नये याची काळजी घेण्यासाठी भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने ही पुढची चाल खेळली आणि अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.
राज्यात अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रीपदानंतर पुन्हा मंत्रिमंडळात इतर मंत्री पदे भूषवले आहेत यामध्ये अगदी अशोक चव्हाण, नारायण राणे अशी अलीकडच्या काळातील काही मंत्र्यांची नावे घेता येतील. त्यामुळे मुख्यमंत्रीपदानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याने देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमी झाले आहे असे नाही, परंतु दोन पावले मागे सरून भाजपला मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणण्याच्या हेतूनेच हा मास्टरस्ट्रोक भाजपाच्या शिर्षस्थ नेतृत्वाने खेळला आहे.
तसेही बंडखोर शिवसेनेचे झाले नाहीत, ते भाजपचे काय होतील? याची भाजपाला देखील काळजी आहे. त्याकरताच काहींना ईडीच्या दबावाखाली, काहींना निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत पाठवले होते त्या प्रेमापोटी आणि काहींना पुन्हा आमदारकीसाठी मदत करण्याच्या आश्वासनाने या सरकारमध्ये भाजप राहील, मात्र 2024 मध्ये सध्याच्या सरकारपेक्षा पूर्ण बहुमताचे स्वबळावर सरकार आणायचे आहे, त्यासाठी अगदी कालपासूनच भाजप कामाला लागली असे म्हटले तर वावगे होणार नाही.