दौंड : महान्युज लाईव्ह
पाटस – कानगाव या प्रमुख जिल्हा रस्त्यावर पाटस परिसरातील सिमेंट कंपनीच्या वाहतूक करणार्या वाहनांमधील सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी पडत असल्याने रस्त्यावरून दुचाकी वाहने व विद्यार्थ्यांच्या सायकली घसरुन पडुन अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास दुचाकीचालक व शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. या कंपनीच्या वाहनांवर ठोस अशी कारवाई करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
काही ठराविक गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून पाटस, पाटस रेल्वे स्टेशन व कानगाव हद्दीत दोन सिमेंट कंपन्या झाले आहेत. सध्या ह्या कंपन्या चालू असल्याने या कंपनीकडे जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाहतूक पाटस – कानगाव या रोड वरून दिवस – रात्र भरधाव वेगाने सुरू आहे. पाटस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागेश्वर विद्यालय व पाटस पोलीस चौकी समोर तसेच पाटस स्टेशन पर्यंत या वाहनांमधील सिमेंट ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर इतरत्र पडलेले असते. परिणामी वाऱ्यामुळे प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालक व शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात हे सिमेंट जात आहे तर दुचाकी व शालेय विद्यार्थ्यांच्या सायकली ह्या सिमेंटवरून घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातात दुचाकीचालक व विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापतीच्या घटनेत अलीकडे मोठी वाढ होत आहे. सिमेंट कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून वाहनांमधील सिमेंट रस्त्यावर पडणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत कार्यालय यांनी ह्या प्रकाराकडे त्वरित लक्ष घालून संबंधित कंपनी व सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थ करीत आहेत.