मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले आहे.
या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस असणार नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने हा मास्टरस्ट्रोक मारला आहे. सत्तेच्या लालसेने भाजपाने हा सगळा खेळ घडवून आणला अशी टिका भाजपावर होत होती. उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभुतीची लाट तयार होत होती. या सगळ्याला या निर्णयाने कलाटणी दिली आहे. प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची सत्तेसाठी काहीही करणारा नेता अशी बनत चालली होती. अजित पवारांबरोबर केलेला पहाटेचा शपथविधी त्यांच्या प्रामाणिक नेत्याच्या प्रतिमेवर मोठा आघात करणारा ठरला होता. ही प्रतिमा सुधारण्यासही या निर्णयामुळे मदत होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारचे सुपर मुख्यमंत्री असतील. भारतीय जनमानसात त्यागाला मोठी किंमत आहे. मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा या निर्णयाने चांगलीच उजळून निघणार आहे. दिर्घकालीन राजकारणासाठी त्यांना आजच्या या निर्णयाचा खूपच फायदा होणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने आता शिवसैनिकांची विरोधाची धारही बोथट होणार आहे. मुंबईची महानगरपालिका जिंकण्यासाठीही आता भाजपाला या निर्णयाचा फायदा होणार आहे. भाजपाने हा निर्णय दूरवरचा विचार करून घेतलेला आहे. आता या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रसेही बॅंकफूटवर जाणार आहेत.