शिरूर : महान्यूज लाईव्ह
ढोलाची झिंग..सनईचे सुर अन् ताशाचा थरथराट यातून गेली अनेक वर्षे नीर्वि येथील मनियार कुटुंब ही लोककला टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सध्या डी.जे.जमाना आहे. या डीजेच्या तालावर तरुणाई ठेका धरत असली तरी याही जमान्यात आपल्या लोककला तग धरून आहेत.
निर्वी येथील मानियार कुटुंबातील वडील,दोन भाऊ यांनी ताशा वादनाच्या माध्यमातून आयुष्य या कलेस समर्पित केले आहे. याकूब भाई मनीयार हे गेली ५० वर्षांपासून ताशा वादक म्हणून काम करतात. तर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र शिराज मणियार व कनिष्ठ सुपुत्र ३५ वर्षांपासून ताशा वादन करतात. मणियार यांच्या कलापथकात सात जणांचा समावेश असतो.या बाबत बोलताना शकील हे सांगतात की,आमच्या कुटुंबात ही कला टिकवण्यासाठी आम्ही जीवतोड मेहनत घेत असून ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तेथे गण गवळण,भावगीते,भक्तिगीते, चित्रपट गीते,युगुलगीते,नवीन जुनी यावर वादन केले जाते.जुगलबंदी मध्ये ताशा, ढोल व सनई यामध्ये वाद्यकाम केले जाते. तर नागरिकांच्या पसंतीनुसार लहान सवारी, मोठी सवारी,दोन चोपी, चार चोपी,तीन चोपी,पाच चोपी या माध्यमातून कला सादर केले जाते. गेली अनेक पिढ्यांची पिढीजात परंपरा ही कलाकार मंडळी जपत असून कलाविष्कार सादर केला जात आहे.
ग्रामीण भागात लग्न समारंभ,धार्मिक कार्यक्रम,राजकीय कार्यक्रम आदी कार्यक्रमात यांच्या कलपथकास मोठी मागणी असते तर जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यात जाऊन कला देखील सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे हलाखीचे दिवस होते. शासनाकडून ही फारशी मदत होऊ शकली नाही. मात्र पुन्हा कार्यक्रम सुरू झाल्याने कलाविष्कार सादर केले जात असून त्यामाध्यमातून पुन्हा लोकांचे मनोरंजन करण्याचे भाग्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.