शिरूर : महान्यूज लाईव्ह
इंग्रजाच्या काळातील पोलिस कोठडी…आरोपी कौले उचकटून पळून गेला मात्र आता यात दोष कोणाचा सवाल केला जात आहे.
शिरूर पोलिस स्टेशन मधील पोलिस कोठडीत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रेवण उर्फ रोहन बट्टीबिरू सोनटक्के (रा. वारजे माळवाडी पुणे) हा अटकेत होता.अटकेत असताना आरोपी रोहन याने पोलिस कोठडी मधील बंद खोलीची कौले उचकटून पहाटेच्या सुमारास पलायन केले. मात्र या घटनेवर दृष्टिक्षेप टाकला असता हि कोठडी असलेली इमारत इंग्रजांच्या काळातील असून तिची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या पोलिस कोठडीत चार खोल्या आहेत. इमारत अतिशय जुनी झालेली आहे.सदर इमारतीस पाठीमागील बाजूस संरक्षक भिंत नाही. व वरील बाजू कौलारू असून ते जीर्ण व मोडकळीस आलेली आहे.या इमारतीची डागडुजी करण्यासाठी शिरूर पोलिस स्टेशन ने सन २०२० मध्ये उपअभियंता बांधकाम विभाग शिरूर यांना पत्र दिले होते.या पत्राची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्यात आले होते.मात्र त्यावर निधी न पडल्याने ते काम तसेच राहून गेले. नुकतेच या कोठडीतून आरोपीने पलायन केल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात या पोलिस स्टेशनच्या पोलिस कोठडीची चर्चा रंगू लागली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच शासनाने वेळीच या गोष्टीची दखल घेतली असती तर अशी घटना घडली नसती.या प्रकरणी पोलिसांवर दोष गेला असला तरी प्रथमदर्शनी यात पोलिसांची कोणतीही चूक असल्याचे दिसून येत नसून जीर्ण झालेले कौलारू खोली व या मागील सत्य हे पाहणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
शिरूर पोलिस स्टेशन येथे खरंतर इतकी जुनी इमारत असतानाही व विषय अतिशय गंभीर असतानाही याकडे का गांभीर्याने का पाहिलं जात नाही.यात वेळीच दक्षता घेतली असती तर अशी घटना घडली नसती. या कोठडीत पावसाळ्यात सातत्याने डास, मच्छर यांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. यावेळी कोठडीतील आरोपींची,बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो यावेळीही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही मग आता तरी प्रशासन खडबडून जागे होणार का ? की पोलिसांचा बळी देणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालय देखील निर्माण केले आहे.त्यामुळे लवकरात लवकर या पोलिस स्टेशनचे स्थलांतर करणे गरजेचे आहे.