टी. के. जगताप
नीरा : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जात आहेत. या पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत आहेत. त्यांच्यासोबतच अनेक हवसे, गवसे आणि नवसेही त्या गर्दीचा भाग होत आहेत. पण विठूराया कुणाच्या मनात काय पेरून जातो, हे आपल्याला उमगत नाही, आणि मग असे हवसे, गवसे, नवसे आणि खरा श्रद्धावंत वारकरी यांच्यातला भेदही कळत नाही.
२८ जूनच्या संध्याकाळी मी दत्त घाटाकडे जाताना नीरेतील जुन्या पुलाशेजारील स्मशानभूमीकडे माझे सहज लक्ष गेले. त्यावेळी एक तरुण जिथे प्रेते जाळतात, त्या चौकटीवर अगदी निवांत झोपलेला दिसला. वाट वाकडी करून तिथे गेलो. तो झोपेतच होता. झोपेत असतानाच त्याचे मोबाईलवर फोटो घेतले. मनात वाटले कोणीतरी वेडा, माथेफिरू किंवा व्यसनी दिसतोय. त्यानंतर त्याला जागे करुन त्याच्याशी मारलेले गप्पातून हा खरा वारकरी मला उलगडत गेला.
त्याचे नाव सुनील नामदेव वानखेडे, राहणारा बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचा. बीएससीच्या पहिल्या वर्गातच गरीबीमुळे शिक्षण सुटले. मग बिगारी काम सुरु केले. सध्या खेड शिवापूर येथे गवंडी काम करतो. शेगाव येथे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहेत. मुलांचे शिक्षण चालू आहे. दोन महिन्यातून एकदा घराकडे चक्कर टाकायची, काही हवे नको ते पहात असतो. पण दरवर्षी वारी चुकवत नाही. कोणत्या ना कोणत्या संताच्या पालखीसोबत पंढरपूरपर्यंत पायी चालतो, अशी माहिती त्याने दिली.
त्याच्याशी चर्चा करताना त्याचे संत साहित्याचे वाचन असल्याचे लक्षात आले. गौतम बुद्ध , तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचा त्याचा अभ्यास असल्याचे त्याने सांगितले. त्याच अभ्यासाच्या बळावर स्मशानभूमीतही शांत झोप लागत असल्याचे त्याने सांगितले. संतांनी समाजाच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम केले. स्मशानात शांतता असते. येथे मला अगदी शांत झोप लागली असे त्याने सांगितले. लोकांमध्ये स्मशानाबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठीच मी स्मशानात झोपतो असेही त्याने सांगितले.
कोणत्याही पारंपारिक दिंडीत सामील न होताही पुर्ण श्रद्धा बाळगणाऱ्या अशा अनोख्या लोकांचे दर्शन तो पांडुरंग आपल्याला दरवर्षी वारीच्या निमित्ताने घडवत असतो. यातून योग्य ती शिकवण आपण घेण्याची गरज आहे.
या अनोख्या वारकऱ्याने झोपेतून उठविल्याबद्दल माझे आभार मानले. त्याला काही पैसे देत होतो, तेदेखील त्याने घेतले नाहीत, मोबाईलही वापरत नसल्याचे सांगितले आणि पांडुरंगाच्या या सच्च्या भक्ताने पुढच्या पायी वारीला सुरुवात केली.
राम कृष्ण हरी…. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🚩