तोच जोश, तोच उत्साह, तेच आनंदमय, नैसर्गिक व भक्तीमय वातावरण! वरुणराजाने ही केला वर्षाव!
राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंडचा मुक्काम आटोपून लाखो वारकरी भाविकांचा हा पालखी सोहळा सोमवारी सकाळी दहा वाजता पाटस येथील ग्रामदैवत श्री. नागेश्वर मंदिरात विसाव्यासाठी दाखल झाला. तीन तासांच्या विश्रांती नंतर हा पालखी सोहळा रोटी घाटाचा नागमोडी अवघड टप्पा पार करीत भक्तीमय वातावरणात पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रद्द झाला होता. दोन वर्षानंतर पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचा हा पालखी सोहळा पुन्हा सुरू झाली. दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा पूर्वीपेक्षा कमी वळणाचा नव्याने केलेला चौपदरी व चकाचक रस्ता.. तोच जोश..तोच उत्साह.. आणि तोच आनंद, तेच भक्तिमय आणि नैसर्गिक वातावरण रोटी घाटात आजही पहायला मिळाले.
रोटी घाटाचा नागमोडी वळणाचा अवघड टप्पा पार करताना डोळ्यांचे पारणे फिटले. अनेकांनी हे नयनमोहक दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवले..हजारोंनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद घेतला. रोटी घाट चढायला संत तुकाराम महाराजांच्या पालखीला बारा बैलजोड्या जोडल्या होत्या.
टाळमृदुंगाच्या गजरात आणि मुखी ज्ञानोबा तुकाबांचा नामघोष करीत उत्साहामय वातावरणात हा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी येथे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. घाटात पालखी सोहळा येताच वरुणराजानेही वर्षाव करीत या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती महादजी शिंदे,श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबे पाटस या ऐतिहासिक भूमीत विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालखी सोहळ्याचे आगमन होताच वारकरी भाविकांचे सरपंच अवंतिका शितोळे, ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे, महसूल पुरवठा अधिकारी प्रकाश भोंडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, माजी सरपंच योगेंद्र शितोळे, तानाजी केकाण, ग्रामपंचायत सदस्या शितल चव्हाण, सायराबानू शेख, तृप्ती भंडलकर, स्वप्निल भागवत, अशोक पानसरे, साहेबराव वाबळे, बाळासाहेब चव्हाण, संभाजी देशमुख, छगन म्हस्के, अभिजित शितोळे, माणिक चोरमले, गणेश चोरमले यांच्यासह ग्रामस्थांनी पुष्पहार व श्रीफळ देऊन जंगी स्वागत केले.
मागील दोन वर्षानंतर पुन्हा लाखो भाविकांचा हा पालखी सोहळा आपल्या गावात आल्याने पाटसकर यांनी स्वागतासाठी स्वागत कमान उभारलेली होती. भाविकांच्या चहा नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली होती. विश्वरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरापर्यंत रांगोळीची पायघडी घालण्यात आली होती.
ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात हा पालखी सोहळा विसाव्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यावेळी नागेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांनी संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण फराटा, गणेगाव, कानगाव, गार, बेटवाडी, सोनवडी, गिरीम, नानविज, कुसेगाव तसेच दौंड शहरासह दौंडच्या पूर्व भागातील गावातील नागरिकांनी रांगेत उभे राहून श्री नागेश्वर मंदिरात तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले.