सर्वोच्च न्यायालयात आज दोन वेगळा याचिका दाखल करण्यात आल्या असून आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध वकील रविशंकर हे विधानसभा उपाध्यक्षांसाठी युक्तिवाद करणार आहेत. महाराष्ट्रातील ऐतिहासिक बंड आता सुप्रीम कोर्टाच्या दारात पोचले असून 16 बंडखोरांना अपात्र ठरवण्याच्या नोटीसला सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनीही याचिका दाखल केली आहे.
आज सकाळी दहा वाजता सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईल. या वेळी महाविकास आघाडीच्या व राज्य सरकारच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करणार आहेत. महेश जेठमलानी हे भरत गोगावले यांचे वकील असणार आहेत.
मनसेमध्ये विलीनीकरणाचा पर्याय?
महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक एक ट्विस्ट आला असून शिंदे गटाला आता विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, मात्र ते भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केल्याचे समोर आले असून, एक आमदार असलेल्या मनसेला आता 40 ते 50 आमदारांचा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
शिवाय मनसे अचानक सरकारमध्ये येण्याची देखील शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि ठाकरे वलयासाठी एकनाथ शिंदे यांचा गट मनसेमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. वेगळ्या तांत्रिक मुद्द्यावरील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली असून, विलिनीकरणाचा मुद्दा आला तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपपेक्षा मनसेचा पर्याय जवळचा राहील, नव्हे तर भाजपमधील धुरिणांनीही त्यांना अशा प्रकारचा पर्याय दिल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून समजते.