दौंड: महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या समतल रेल्वे मार्गावर ये जा करण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे भुयारी मार्ग उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल ६८ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. दौंड तालुक्यात रेल्वे मार्गावर अनेक गावांमध्ये रेल्वे भुयारी मार्गाच्या कामांस सुरुवात झाली आहे.अशी माहिती भाजपचे आमदार राहुल कुल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
आमदार अॅड. राहुल कुल यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून दौंड तालुक्यातील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांसंदर्भीत चर्चा केली होती. त्यानंतर ही कुल यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने दौंड तालुक्यातील सहजपूर व खामगाव येथे उड्डाणपूलास उभारण्यास मंजुरी दिली असून तसे पत्र जारी केले आहे.
सहजपूर येथील उड्डाणपुलासाठी ३४ कोटी ५ लाख तर खामगाव येथील उड्डाणपुलासाठी ३४ कोटी ४५ लाख अशा एकूण ६८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्चाच्या अंदाजपत्रकास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया काढून कामास सुरवात होणार आहे.
यापूर्वी दौंड तालुक्यातील भांडगाव – खुटबाव, केडगाव – बोरीपार्धी, दापोडी, वरवंड – कडेठाण – हातवळण, पाटस – कानगाव, नानविज – गिरीम व लिंगाळी – खोरवडी या सहा रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग ऐवजी भुयारी मार्ग उभारण्यात यावा यासाठी आमदार कुल यांनी पाठपुरावा केला होता. यापैकी वरवंड – कडेठाण – हातवळण, पाटस – कानगाव व नानविज – गिरीम या तीन ठिकाणी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. खामगाव व सहजपूर येथे उभारण्यात येणारे उड्डाणपुल तसेच पुणे सोलापूर रेल्वेमार्गावर दौंड तालूक्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या भुयारी मार्गांमुळे रस्त्यांची उत्तम जोडणी होणार दळणवळण करणे जलद गतीने होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची करणे सोईस्कर होणार आहे.