घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
महाराष्ट्रात सत्ताकारणाचा सुरु असलेला तमाशा सध्या आपण सगळेच पहात आहोत. पहिल्या दिवशी रोमांचकारी वाटलेला हा सामना सर्वसामान्य माणसासाठी दिवसेंदिवस कंटाळवाणा होऊ लागला आहे. न्युज चॅनेलवर तीच तीच चर्चा ऐकूनही कंटाळा येऊ लागला आहे. अशा स्थितीत काही आमदारच लोकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असताना दिसत आहेत. अशा दोन आमदारांची ओळख आपल्याला करून देण्याचा विचार आहे.
पहिले आहेत आपले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील. गुवाहाटीच्या भर शहरातील एक आलिशान हॉटेलमध्ये गेले काही दिवस शहाजीबापूंचा मुक्काम आहे. एक क्षणदेखील ते येथून बाहेर पडू शकलेले नाहीत. पण त्यांनी एक कार्यकर्त्याशी केलेल्या संभाषणाची जी ऑडिओ क्लीप सध्या सोशल मिडियावर फिरते आहे, त्यात त्यांनी जाम मजा आणली आहे.
संभाषणाच्या सुरुवातीलाच ‘ काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे ‘ असे ते म्हणताना दिसतात. गुवाहाटी शहरात राहून शहाजीबापू कोणत्या झाडीविषयी आणि कोणत्या डोंगाराविषयी बोलताहेत हे त्यांचे त्यांनाच माहिती.
दुसरे मोर्शीचे आमदार देवेंद्र भूयार. शेतात पेरणी करतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहे. पायात बुट, जीन पॅन्ट आणि पांढरा स्वच्छ टी शर्ट घालून ते बैलजोडीच्या साह्याने पेरणी करताना दिसताहेत. आता कुठला शेतकरी पायात बुट, स्वच्छ जीन आणि पांढराफेक टीशर्ट घालून पेरणी शेतात राबतो ते देवेंद्र भुयारांनाच माहिती.
गुवाहाटी शहरातील आलिशान हॉटेलमध्ये राहून आसाममधल्या डोंगार आणि झाडीला ओक्के म्हणणारे सांगोल्याचे शहाजीबापू आणि मोर्शीच्या शेतातले स्वच्छ आणि सुंदर देवेंद्र भुयार. इतक नाटकी वागण नाटकवाल्यांनाही जमणार नाही. पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनोरंजनात काही कमी पडू नये यासाठी हे जनसेवक काहीही करायला तयार आहेत.
सध्याच्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील कंटाळवाणेवाणा अशा या हरहुन्नरी कलाकारांमुळेच थोडासा दूर होतो आहे. त्यामुळेच सोशल मिडियावरील नेटकरी याची भरपूर मजा घेत आहेत.