राजेंद्र झेंडे
दौंड: महान्युज लाईव्ह
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्याच्या हद्दीत आगमन झाले.टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी भाविकांचा हा सोहळा हवेली तालुक्यातुन दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दाखल होताच श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
बोरीभडक ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. तर पालखी सोहळा स्वागतासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, प्रशासकीय अधिकारांच्या वतीने दौंड – पुरंदर चे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दौंड तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, बोरीभडक चे सरपंच, बारामती लोकसभा मतदारसंघ च्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे,भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, माजी आमदार रमेश थोरात,माजी आमदार रंजना कुल आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवारी रात्रीचा हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून शनिवारी ( दि.२५ ) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथील दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झाला होता. पावसाच्या सरी अंगावर झेलत सायंकाळी साडेचार वाजता पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यात पालखी सोहळ्याचे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी झुंबड उडाली होती. दरवर्षी प्रमाणे हीच परंपरा यावर्षी देखील पाहायला मिळावी. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा पालखी सोहळा रद्द झाला होता. पालखी सोहळा आणि तुकोबांचे न घडलेले दर्शन त्यामुळे यावर्षी पालखी मार्गावर वैष्णवची उपस्थित लक्षणीय दिसत होती.
ऊन सावल्यांचा खेळ आणि जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष, विठ्ठल रखुमाईचा जयघोष यामुळे पालखी मार्गवरील वातावरण भक्तीत न्हाऊन गेले होते.