मुंबई : महान्यूज लाईव्ह
पैठणचे आमदार संदिपान भूमरे तिकडे गुवाहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये आराम करताहेत, पण सध्या नशिब त्यांच्यावर प्रचंड खुश आहे. इकडे महाराष्ट्रात म्हाडाच्या घराच्या लॉटरीत त्यांचे नाव निघाले आहे. औरंगाबादमधील म्हाडाच्या चिकलठाणा येथील घरासाठी शुक्रवारी ऑनलाईन सोडत जाहीर झाली. या लॉटरीत मंत्री संदिपान भुमरे यांना आमदार कोट्यातून म्हाडाचे घर मिळाले आहे.
म्हाडाच्या १२०० सदनिकांसाठी शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने सोडत घेण्यात आली. या सोडतीसाठी आठही जिल्ह्यांतून जवळपास ११ हजारापेक्षा जास्त अर्ज आले होते. म्हाडासाठी विविध गटांसाठी काही सदनिका राखीव ठेवल्या जातात. यातूनच राज्यातील लोकप्रतिनिधींसाठी दोन टक्के कोटा राखीव ठेवला जातो. या राखीव कोट्यातून मंत्री भूमरे यांना घर मिळाले आहे.
सोशल मिडियावर औरंगाबादचे सामान्य नागरिक या सगळ्या प्रकारावर टीकेचा भडिमार करीत आहेत. म्हाडा हे खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असतानाही संदिपान भूमरेंना हे घर मिळाले. मग राष्ट्रवादी आमची कामे करत नाहीत असे भूमरे कसे म्हणू शकतात, असे एका कॉमेंटमध्ये म्हणले आहे. तर एका सामान्य नागरिकाला घर मिळाल्याबद्दल अभिनंदन अशी पोस्ट टाकून आमदारांवर उपहासात्मक टिकाही काहींनी केली आहे.
आधी सूरत आणि आता गुवाहाटी येथे आलिशान हॉटेलात राहणे या आमदारांना कसे परवडू शकते याबाबतही सामान्य नागरिक चर्चा करीत आहेत. अशा हॉटेलमध्ये अवाढव्य खर्च नेमके कोण करत आहे आणि का करत आहे, असाही प्रश्न लोक विचारत आहे. त्यातच भूमरे यांना लागलेल्या घराच्या लॉटरीने टीकेची धार आणखी तीव्र झाली आहे.