घनश्याम केळकर
भोर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरहून गाई आणि बैलाचे मांस भरुन पुण्यातील कोंढवा येथे विक्रीसाठी निघालेली दोन वाहने पोलिसांनी पकडली आहेत. या वाहनांतून ३५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.
पुणे शहरात गोरक्षणाचे काम करणारे शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना अशा प्रकारे गोमांसाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते पुणे सातारा हायवेवर आपल्या सहकाऱ्यांसह लक्ष ठेऊन होते. त्यावेळी खेड शिवापूर टोलनाक्यावर ही वाहने त्यांना आढळून आली. त्यांनी या वाहनांचा पाठलाग सुरु केला, आणि पोलिसांनाही फोन करून त्यांची मदत मागितली. जु्न्या कात्रज रोडवर पोलिसांनी ही वाहने अडवली आणि शिंदेवाडी पोलीस चौकीसमोर आणली. या दोन्ही पिकअप जीपमध्ये गाई आणि बैलाचे कातडी काढलेले धड, मुंडके आणि पाय आढळून आले. या मासांवर ताडपत्री आणि भाजीचे कॅरेट ठेऊन ते झाकण्यात आले होते.
या प्रकरणी अजीम पिरमहंमद शेख ( रा. महमंदवाडी, हडपसर ), अशरफ शौकत खान ( शेरखान चाळ, कोंढवा ) आणि करीम अब्दूल रशीद बांगी ( भवानी पेठ ) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनीही हे मांस इंदापूर येथे भरले असून ते विक्रीसाठी कोंढवा येथे नेत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
राजगड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार पुढील तपास करीत आहेत.