मुंबई : महान्यूज लाईव्ह
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सांगोल्यातील एका कार्यकर्त्यासोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवारांवर टिकास्त्र सोडलेले आहे.
राष्ट्रवादी सोडल्याने अजीत पवारांचा आपल्यावर राग आहे. ते कायम सुडानेच पेटलेले असतात. त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असून त्यांच्या पाया पडलो. बुटाला हात लावला तरी अढी काही जात नाही अशी टिका शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांवर केली आहे.
येथील कोणाचाही उद्धव ठाकरेंवर राग नाही, पण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आपल्याला संपवून टाकले असते. मग उघड्यावरच पडलो असतो, त्यामुळे हा पर्याय निवडावा लागल्याचे त्यांनी या क्लिपमध्ये म्हणले आहे. एकनाथ शिंदे यांचे त्यांनी खुपच कौतुक केले आहे. कोणतीही ओळख पाळख नसताना, कोणतेही आढेवेढे न घेता काम करतात. गणपराव पाटलांच्या मतदारसंघातून निवडून आल्याने काहीही अडचण असली तरी सांगा असे एकनाथ शिंदे म्हणत असल्याचेही ते म्हणत आहेत.
गेल्या अडीच वर्षात मतदारसंघात काहीच निधी मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले तरी त्यावर काही निर्णय होत नाही, असेही त्यांनी म्हणले आहे. विकासकामातील १० टक्के रक्कम राष्ट्रवादीकडे जात असल्याचा आरोपही या क्विपमध्ये त्यांनी केलेला आहे.
शरद पवारांनी प्रेमाने नाही तर रागाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. संजय राऊतांच्या मार्फत त्यांनी ही संधी साधून शिवसेना संपविण्याचेच काम केल्याचेही ते म्हणताना दिसत आहेत. विधानसभेत गणपतराव देशमुखांच्या श्रद्धांजलीपर भाषणांच्या वेळी आपल्याला संधी दिली नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.