राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
जगतद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात शनिवारी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील यवत व वरवंड येथील पालखी मुक्काम स्थळावर पाणी, वीज, मोफत आरोग्यसेवा, भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. पालखीच्या स्वागतासाठी शासकीय प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. अशी माहिती दौंड तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा दौंड तालुक्यातुन जात आहे. शनिवारी ( दिनांक २५ ) या पालखी सोहळ्याचे तालुक्यात आगमन होणार आहे. यवत व वरवंड या दोन ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पालखी स्थळ व पालखी मार्गावरील गावांची पाहणी करून संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, दौंड – पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागताची व विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी यवत येथे पालखीचा मुक्काम असल्याने या मुक्काम स्थळावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी परिसरातील अकरा विहिरी मधुन पाणीपुरवठा करण्यात येणार असुन या ठिकाणी ग्रामसेवक यांची निवड केली आहे. टॅंकरद्वारे पालखी मार्ग व पालखी स्थळावर पिण्याच्या पाण्याचे टॅंकर उपलब्ध करण्यात येणार आहे. पालखी मुक्काम स्थळांच्या आसपास ८ ते १० फिरते शौचालय उपलब्ध करण्यात आली आहे तसेच ११ गॅस एजन्सींना गॅस पुरवठा वेळेत उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी गाव कामगार तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पालखी कालावधीत पालखी मार्गावर व पालखी स्थळावर कसल्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, वीजेची कामे, काही तांत्रिक अडचणी यासंदर्भात महावितरण कंपनीला योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून पालखी मुक्काम ठिकाणी राखीव वीज पॉवर पॉइंट काढण्यात आले आहेत. दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिककिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. यवत व वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड सेंटर उपलब्ध करण्यात आले असून याठिकाणी कोवीडची तपासणी केली जाणार आहे. तसेच नऊ ते दहा रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असून येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सेवा देण्यात येणार आहे. अपघातांच्या घटना घडल्यास त्यासाठी रुग्णवाहिका व दोन अग्निशमन बंबाची वाहने पालखी मुक्काम ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेतेसाठी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
पालखीच्या कालावधीत पुणे सोलापूर महामार्गावर इतर वाहनांची वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलीसांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालखी मुक्काम ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून याठिकाणी नायब तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील घाण,केरकचरा, काटेरी झुडपे, साफसफाई व स्वच्छता करण्यात आली असून पालखी मुक्काम स्थळावर साफसफाई करण्यात आली आहे. पालखी मार्गावर काही ठिकाणी किरकोळ साफसफाई राहीली असेल तर ती आज सायंकाळी अखेर पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास देण्यात आल्या आहेत. खडकवासला कालव्याद्वारे वरवंड ते पाटसपर्यंत कालव्याचे पाणी सोडण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.
पालखीच्या स्वागतासाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पालखीसोबत येणाऱ्या भाविकांची दौंड तालुक्याच्या हद्दीत कसलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.