राजेंद्र झेंडे
महान्यूज लाईव्ह
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रविवारी ( दिनांक २६ ) दौंड तालुक्यातील वरवंड येथे मुक्कामी येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. दोन वर्षानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी ही वरवंड मुक्कामी येणार आहे.या पालखीच्या स्वागतासाठी वरवंड ग्रामस्थ सज्ज झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाने वारकरी भाविकांची आरोग्य पाणी शौचालय अशा विविध प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
दरम्यान ,या पालखी मार्गावर प्रमुख आकर्षण ठरत आहे ते वरवंड येथील पुणे – सोलापूर महामार्ग अर्थात संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उड्डाणपुलाच्या भिंतीवर रेखाटन करण्यात आलेले चित्र. या भिंतीवर पंढरीचा पांडुरंग,संत तुकाराम महाराज यांचे सुंदर असे बोलके चित्र रेखाटन करून भिंती सजावट करण्यात आली आहे, या भिंतीवर वारकरी दिंडी घेऊन पंढरीच्या दिशेने निघाल्याचे चित्र रेखाटन केले आहे तसेच पृथ्वी वाचवा जीवन वाचवा, प्राणी संरक्षण करा,जल है तो कल है अशा विविध प्रकारचा पर्यावरणाचा संदेश त्यानिमित्ताने देण्यात आला आहे. दोन्ही बाजूने भिंतीवरील बोलके चित्र रेखाटन हे प्रमुख आकर्षण ठरले असून ते येजा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळावर विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, आरोग्य सेवा तसेच वारकरी भाविकांच्या मोबाईलला चार्जिंग सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली आहे. पालखी मुक्काम स्थळ तसेच पालखी मार्गावरील केरकचरा, घाणीचे ढीग साफसफाई करून स्वच्छता करण्यात आली आहे. अशी माहिती उपसरपंच प्रदीप दिवेकर यांनी दिली.
वरवंड या ठिकाणी पालखी मुक्कामी येत असल्याने पालखी सोहळ्याला चार दिवसाचा अवधी असुन त्यापुर्वीच या ठिकाणी आकाशी पाळणे, खेळणे आधी दाखल झाल्याने वरवंडला यात्रेचे स्वरूप आले आहे.