मुंबई : महान्यूज लाईव्ह
प्रणयरंगात रंगलेल्या क्रौंच पक्षाच्या जोड्यातील एकाला शिकाऱ्याने मारल्यावर उरलेल्या पक्षिणीचा आक्रोश ऐकून वाल्मिकी ऋषींची म्हणे प्रतिभा जागृत झाली आणि त्यांच्याकडून रामायणाची रचना झाली. याच रामाच्या अयोद्धेतील शरयू नदीत स्नान करताना आपल्या बायकोचे चुंबन घेणाऱ्या एका पतीला बेदम मारहाणीला सामोरे जावे लागण्याचा व्हिडिओ पुढे आला आहे.
https://twitter.com/Suneet30singh/status/1539530199921852416?s=20&t=A31DnoJoZEG1qrXoZqs9iQ
अयोद्धमधील राम की पौडी येथील शरयू नदीमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. येथे स्नान करत असलेल्या जोडपे एकमेकांचे चुंबन घेत असल्याचे पाहून आजुबाजूच्या लोकांचे पित्त खवळले आणि त्यांनी त्या जोड्यातील पुरुषाला बाजूला घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मारहाणीत अनेकांनी आपला हात धुऊन घेतल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. आपल्या जोडीदाराला या जमावापासून वाचविण्याचा प्रयत्न संबंधित महिला करीत होती. परंतू तिला बाजुला ढकलण्यात आले. या दोघांनीही जबरदस्तीने तेथून हाकलून देण्यात आल्याचीही माहिती आहे.
‘ यहां ऐसा नही चलेगा’ असे यातील काही लोक म्हणत असल्याचेही या व्हिडिओत दिसते आहे. कायदा हातात घेऊन मॉरल पोलिसिंगच्या या प्रकाराची आता पोलिसांनीही दखल घेतली असून हा व्हिडिओच्या आधारे ते आता संबंधितांचा शोध घेत आहेत. मात्र याप्रकरणी संबंधित जोडप्याने तक्रार दिलेली नाही, असेही पोलिसांनी म्हणले आहे.