बारामती : महान्यूज लाईव्ह
आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी माणसाला काहीतरी करावे लागते, मग ती नोकरी असो की व्यवसाय. मात्र अशी नोकरी किंवा व्यवसाय मिळविण्याच्या नादात योग्य ती दक्षता घेतली नाही तर मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. दररोज अशा फसवणुकीच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला वाचायला मिळत असतात. बारामतीसारख्या छोट्या गावातही आता अशा फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातलीच एक ताजी घटना आज उघड झाली आहे.
बारामती शहरातील कांचनगर येथे राहणाऱ्या संतोष गणपत रेणके यांची ७ लाखाहून अधिक रक्कमेची फसवणूक झालेली आहे. त्याबाबतची फिर्याद त्यांनी आज बारामती शहर पोलिसांकडे दाखल केली आहे. वर्षभरापूर्वी रेणके यांनी फेसबुकवर एका आयुर्वेदिक कंपनीची जाहिरात पाहिली. या कंपनीला डिलर नेमायचे होते. रेणके यांना या व्यवसायात रस वाटल्याने त्यांनी १७ एप्रिल २०२१ रोजी या कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांचे विशाल पाटील या रिलेशनशीप मॅनेजरशी बोलणे झाले. विशाल पाटील यांनी डिलरशीपसाठी कंपनीला विशिष्ठ पद्धतीचीच दुकानाची रचना लागते. ही रचना संपुर्णपणे कंपनी उभी करते. या खर्चापोटी तुम्हाला दोन लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर कंपनी तुम्हाला चार लाखाचा माल देईल, असेही त्याने सांगितले. येथून या फसवणुकीला सुरुवात झाली.
त्यानंतर रेणके यांच्या मेल आयडीवर रजिस्ट्रेशन फॉर्म आला. तो फॉर्म रेणके यांनी आपल्या कंपनीच्या नावाने भरला. या दरम्यान रेणके यांचे विशाल पाटील, डिस्ट्रीब्युशन मॅनेजर सुरेश त्रिपाठी, एचआर डिपार्टमेंटचे अविनाश शर्मा, टीम लीडर अजित जयस्वाल अशा नावे सांगणाऱ्यांशी बोलणे होत गेले. वेगवेगळया कारणांनी या व्यक्तींनी त्यांना जम्मु अॅन्ड काश्मिर बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय बॅंकांमध्ये रक्कम भरायला लावली. अशा प्रकारे रेणके यांनी एकुण ७ लाख ५४ हजार रुपये या वेगवेगळ्या खात्यांवर भरले. त्यानंतर हे पुन्हा संपर्क केला असता हे क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतू अशा सगळ्या प्रकरणात एक गोष्ट लक्षात येते की ज्यांची फसवणूक झाली आहे, त्या व्यक्ती योग्य दक्षता घेत नाहीत. संबंधित कंपनी प्रत्यक्ष जमिनीवर अस्तित्वात आहे का याची तपासणी न करता केवळ डिजिटल साधनांवरच विश्वास ठेवतात. याचाच फायदा घेऊन फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे नोकरी किंवा व्यवसाय मिळविताना अधिक दक्षात घेण्याची गरज आहे.